जाहिरात

Crime News: मैत्रिणीची हत्या अन् मृतदेहावर अत्याचार; 'आत्मा' बोलावण्यासाठी अघोरी कृत्य, भयंकर घटनाक्रम

Crime News: इंदूरच्या द्वारकापुरी परिसरात एका एमबीए विद्यार्थिनीची निर्घृण हत्या करणाऱ्या पियुष धामनोतिया याच्या चौकशीतून अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी माहिती समोर आली आहे.

Crime News: मैत्रिणीची हत्या अन् मृतदेहावर अत्याचार; 'आत्मा' बोलावण्यासाठी अघोरी कृत्य, भयंकर घटनाक्रम


इंदूरच्या द्वारकापुरी भागात घडलेल्या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पियुष धामनोतिया याला पोलिसांनी मुंबईतून अटक केली असून, सध्या तो तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. चौकशीदरम्यान समोर आलेले तपशील एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमालाही मागे टाकणारे आहेत.

 एमबीए (MBA) विद्यार्थिनीची निर्घृण हत्या करणाऱ्या पियुष धामनोतिया याच्या चौकशीतून अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी माहिती समोर आली आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहावर अत्याचार करणे आणि नंतर पश्चात्ताप झाल्याचे नाटक करत मुंबईत जाऊन चक्क 'अघोरी विद्या' करण्यापर्यंत या नराधमाची मजल गेली होती.

हत्येचा घटनाक्रम आणि सीसीटीव्ही पुरावे

10 फेब्रुवारी रोजी पियुष त्या विद्यार्थिनीसोबत तिच्या घरी गेला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे एकत्र घरात जाताना दिसले, मात्र अडीच तासांनंतर पियुष एकटाच बॅग घेऊन बाहेर पडताना दिसला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुषने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. तिने नकार दिल्यावर त्याने तिला दोरीने बांधले आणि तिचे डोळे झाकून तिला 'गिफ्ट' देण्याचे नाटक केले. तिने विरोध करताच त्याने तिच्या छातीवर बसून तिचा गळा दाबला. ती बेशुद्ध झाल्यावर त्याने तिच्या छातीवर चाकूने इतक्या जोरात वार केला की चाकूचे दोन तुकडे झाले.

(नक्की वाचा-  Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)

मृतदेहाशेजारी बसून मद्यपान

हत्येनंतर पियुष पळून गेला नाही. तो बाहेर गेला, बिअर घेऊन आला आणि त्या मृतदेहाशेजारी बसून त्याने मद्यपान केले. चौकशीदरम्यान, त्याने मृतदेहावर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली. त्यानंतर तरुणीला नग्न अवस्थेत सोडून पळून गेल्याची कबुलीही आरोपीने पोलिसांना दिली आहे.

'ब्लॅक मॅजिक' आणि मुंबई कनेक्शन

हत्येचा गुन्हा केल्यानंतर पियुष पनवेलमार्गे मुंबईला पळाला. तिथे तो हॉटेलमध्ये राहिला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने तिचा फोन तोडून टाकला. पनवेलमधील एका निर्जन कोपऱ्यात त्याने अगरबत्ती लावून आणि यूट्यूबवर 'आत्मा कशी बोलावयाची' याचे व्हिडिओ पाहून अघोरी कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्याला मृत विद्यार्थिनीच्या आत्म्याशी बोलायचे होते आणि तिची माफी मागायची होती, असा दावा त्याने केला आहे.

(नक्की वाचा-  Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमान अपघाताचं गुढ उकलणार? रोहित पवार मोठा निर्णय घेणार? दिल्लीत हालचाली)

संशय आणि सायबर गुन्हा

पियुषने केवळ तिची हत्याच केली नाही, तर तिची बदनामी करण्यासाठी त्यांचे काही खाजगी व्हिडिओ कॉलेजच्या ग्रुपवर शेअर केले आणि तिच्या व्हॉट्सॲप स्टेटसवरही अपलोड केले. पियुषच्या मते, ती दुसऱ्या एका मुलाशी डेटिंग ॲपवरून बोलत होती, ज्यामुळे तो असुरक्षित झाला होता. तसेच लग्नासाठी तिच्या घरच्यांचा नकार असल्याने त्यांच्यात वाद सुरू होते.

इंदूर पोलिसांना याबाबत सांगितले की, आरोपी मानसिकदृष्ट्या विचलित झाला असल्याचे भासवत आहे. मात्र, घटनेच्या वेळी त्याने केलेले नियोजन हे अतिशय थंड डोक्याने केलेला गुन्हा असल्याचे दर्शवते. पोलीस या हत्येचा सखोल तपास करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com