Jaya Bachchan : आपल्या उद्धट वागणुकीसाठी नेहमी चर्चेत असणाऱ्या समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जया बच्चन पुन्हा एकदा याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. मंगळवारी, दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये त्यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी आपला राग व्यक्त केला. यावेळी तर त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला त्यांनी चक्क धक्का दिला.
'काय करत आहात तुम्ही?'
या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात बच्चन त्या व्यक्तीला धक्का देताना दिसत आहेत. त्या 'काय करत आहात तुम्ही? हे काय आहे?' असे बोलताना ऐकू येत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदीदेखील उभ्या होत्या. बच्चन यांनी त्या व्यक्तीला धक्का दिल्यावर चतुर्वेदी यांनी मागे वळून पाहिले आणि नंतर क्लबच्या दिशेने निघून गेल्या.
जया बच्चन यांची जुनी सवय
सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे वागण्याची जया बच्चन यांची ही पहिलीच वेळ नाही. नुकतेच, संसदेतील 'ऑपरेशन सिंदूर' या विषयावरील विशेष चर्चेदरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी त्यांना मध्येच टोकल्याबद्दल त्यांनी त्यांना फटकारले आणि 'तुम्ही बोला किंवा मी बोलते,' असे सुनावले. त्यावेळी राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी याच त्यांच्या शेजारी बसल्या होत्या, आणि त्यांचीही समाजवादी पार्टीच्या नेत्याने कानउघडणी केली होती.
( नक्की वाचा : 124 वर्षांच्या मिंता देवी कोण आहेत? ज्यांचा फोटो असलेला टी शर्ट घालून प्रियंका गांधीसह विरोधकांनी केलं आंदोलन )
धनखड यांच्याशीही झाला होता वाद
गेल्या वर्षी संसदेच्या अधिवेशनात समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन राज्यसभा सदनात भडकल्या होत्या, जेव्हा तत्कालीन सभापती जगदीप धनखड यांनी त्यांची ओळख 'जया अमिताभ बच्चन' अशी करून दिली होती. जया बच्चन ज्या एक लोकप्रिय अभिनेत्रीही आहेत, त्यांचे लग्न अमिताभ बच्चन यांच्याशी झाले आहे. धनखड यांनी ज्याप्रकारे त्यांची ओळख करून दिली, त्यावर जया बच्चन यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.