झारखंड: नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात पतीने गाडीसोबतच विहिरीत उडी मारली अन् त्याला वाचवायला धावलेल्या 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. झारखंडमध्ये घडलेल्या या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीशी भांडण झाल्यानंतर एका व्यक्तीने मोटरसायकलसह विहिरीत उडी मारली. त्याला वाचवण्यासाठी ४ जणांनी विहिरीत उडी मारली मात्र त्याला वाचवण्याच्या नादात चारही जणांचा मृत्यू झाला. तर उडी मारलेल्या व्यक्तीचाही बुडून मृत्यू झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, पत्नी रुपा देवीसोबत सुंदर करमाळी याचे नेहमीच घरगुती वाद व्हायचे. नववर्षाच्या पहिल्या दिवशीही पती पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण इतके वाढल की रागाच्या भरात त्याने मोटारसायकलसह विहिरीत उडी घेतली. सुंदरने विहिरीत उडी मारल्याची बातमी अख्ख्या गावभर पसरली.
त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी गावातील चार जणही एकापाठोपाठ एक विहिरीत उतरले. मात्र चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल करमाळी (२६), विनय करमाळी, पंकज करमाळी आणि सूरज भुईया (२४) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवले. सध्या विहीर झाकण्यात आली आहे आणि त्याच्या सभोवतालच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
ट्रेंडिंग बातमी - Beed Crime: मंत्र्याचं नाव सांगत अपहरण,मारहाण, पायाला कुलप लावलं अन् लाखोची लुट