
परदेशात नोकरी करावी. त्यातून बक्कळ पैसा कमवावा असं सर्वांनाच वाटतं. त्यासाठी अनेक तरूण वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करत असतात. एकदा का परदेशात गेल की सर्व काही सेट होईल असं त्यांना वाटतं. तशी उदाहरण ही त्यांच्या समोर असतात. त्यामुळे मग कुणी डंकीने परदेशात जाण्याचा प्रयत्न करतं. तर कुणी एजंटच्या माध्यमातून परदेश गाठण्याच्या तयारीत असतात. याचाच गैरफायदा अनेक एजंट घेत असतात. त्यातून लाखो रुपयांची फसवणूकही केली जाते. असचं एक प्रकरण नवी दिल्लीत विमानतळावर समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिन तरुण आले होते. ते स्पेनला निघाले होते. त्यांच्याकडे शेंजेन व्हिसा आणि विमानाचं तिकिट ही होतं. ही घटना 29 मे 2025 रोजी घडली. ते तिघे ही अमृतसरचे होते. स्पेनला जाण्यासाठी म्हणून ते IGI विमानतळावर पोहोचले. त्यांनी बोर्डिंग काउंटरवर आपली तिकिटे दाखवली. पण ती तिकिटे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. ती तिकीटं एअरलाईनच्या बुकिंग सिस्टममध्ये अस्तित्वातच नव्हती. संशय बळावताच एअरलाईन कर्मचाऱ्यांनी विमानतळावरील स्विस लायजन ऑफिसरकडून त्यांच्या व्हिसाची तपासणी करून घेतली. तो ही पूर्णपणे बनावट असल्याचे आढळून आले.
परदेशात कामाला जाण्याचे स्वप्न त्या तिघांचे तिथेच भंगले. आपली फसवणूक झाली आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर या तिन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली. त्यानंतर इमिग्रेशन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली. एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला. हरजीत सिंह, भगवंत सिंह,आणि गुरचरण सिंह यांना या प्रकरणी अटक करण्यात आली. यातील दोघे जण हे विशीतले तर एक जण चाळीस वर्षाचा आहे. या तिघांनाही एजंटने फसवले होते. चौकशी दरम्यान काय काय झाले हे या तिघांनीही पोलिसांना सांगितले.
चौकशीत त्यांनी सांगितले की, ही संपूर्ण व्यवस्था एक एजंट सोनू वालिया आणि त्याच्या साथीदार कमलदीप सिंह उर्फ कमलने केली होती. तिघांनाही स्पेनमधील माद्रिद शहरात एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्या बदल्यात 17 लाख रुपये या तिघांकडून वसूल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कमलदीप सिंहला कुरुक्षेत्रमधून अटक केली. चौकशीत कमलदीपने सांगितले की, त्याने एक वर्षापूर्वी सोनू वालियाशी संपर्क साधला होता. त्याने त्याला परदेशी जाण्यास इच्छुक असलेले लोक आणण्याची ऑफर दिली होती.
सोनू याआधीच 25 मे 2025 रोजी पंजाब पोलिसांनी अटक केली होती. परंतु कमलदीपने ही माहिती जाणूनबुजून प्रवाशांपासून लपवली होती.जेणेकरून ते मागे फिरू नयेत आणि पैसे बुडू नयेत हा त्याचा त्या मागचा उद्देश होता. आता IGI विमानतळ पोलीस दल सोनू वालियालाही अटक करण्याची तयारी करत आहे. तो सध्या पंजाबमधील गुरुदासपूर तुरुंगात बंद आहे. तसेच, बँक खात्यांची तपासणी, व्हिसा तयार करण्याची प्रक्रिया आणि संपूर्ण एजंट नेटवर्क उघड करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world