मनोज सातवी, पालघर:
Fake disability Scam: पालघर जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील रूपाली तुषार टेंगले या उमेदवाराची दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव जागा असलेल्या चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती करण्यात आली होती. मात्र तिने सादर केलेले श्रवणदोषाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर त्यांची सेवा समाप्त करण्यात आली असून पालघर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या प्रकरणामुळे सरकारी भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Monsoon Date 2026: यंदा मान्यून वेळेआधी... दमदार एन्ट्रीची तारीख ठरली; कधीपर्यंत केरळमध्ये धडकणार?
पालघरमध्ये दिव्यांग भरतीचा घोटाळा
पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील रूपाली तुषार टेंगले यांनी प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करत श्रवणदोष असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते.
सुरुवातीला धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून हे प्रमाणपत्र वैध असल्याचे कळविण्यात आले होते. त्यानंतर टेंगले यांची निवड होऊन त्यांना पालघर जिल्ह्यातील चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती देण्यात आली होती. मात्र पुढील पडताळणीत संबंधित दिव्यांग प्रमाणपत्राची कोणतीही अधिकृत नोंद नसल्याचे समोर आले. तसेच प्रमाणपत्र क्रमांक MH0220419970202321 हे बनावट, खोटे आणि अवैध असल्याचे धुळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ कारवाई करत त्यांची सेवा समाप्त केली.
रुपाली टेंगलेला अटक
या प्रकरणामुळे पालघर जिल्हा परिषद भरती प्रक्रियेत एकच खळबळ उडाली आहे. दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याने पात्र उमेदवारांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पालघर पोलिसांनी रूपाली टेंगले यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, प्रमाणपत्र तयार करण्यात कोणत्या रॅकेटचा हात आहे का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. सरकारी भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्रांचा वाढता वापर प्रशासनासाठी गंभीर आव्हान ठरत असून आता इतर भरतींचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world