जाहिरात

JP Nadda: काँग्रेसशासित राज्यांमध्ये पेपर फुटले तेव्हा मौन का? जेपी नड्डांचा राहुल गांधींना थेट सवाल

वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटमधील  पेपरफुटी आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

JP Nadda: काँग्रेसशासित राज्यांमध्ये पेपर फुटले तेव्हा मौन का? जेपी नड्डांचा राहुल गांधींना थेट सवाल
JP Nadda Attacks Rahul Gandhi : जेपी नड्डा यांनी राहुल गांधींवर पलटवार केलाय.
मुंबई:

JP Nadda Attacks Rahul Gandhi : वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटमधील  पेपरफुटी आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान निवासाबाहेर दिलेले धरणे आंदोलन आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारला धारेवर धरल्यानंतर, आता केंद्र सरकारनेही जोरदार पलटवार केला आहे. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर सडकून टीका केली असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेल्या या अत्यंत गंभीर विषयावर काँग्रेसने घाणेरडे राजकारण करू नये, असा थेट इशारा दिला आहे.

काय म्हणाले केंद्रीय मंत्री?

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना त्यांच्या हेतूवरच गंभीर सवाल उपस्थित केले. गेल्या 10 वर्षांत 150 हून अधिक पेपर फुटल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता. यावर नड्डा म्हणाले की, राहुल गांधी केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी या विषयाचा वापर करत आहेत. 

जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या राजवटीत सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाचा पेपर फुटला, हिमाचल प्रदेशात काँग्रेस सरकार असताना शालेय शिक्षण मंडळाचा पेपर फुटला आणि झारखंडमध्ये काँग्रेस-झामुमो आघाडी सरकारच्या काळात जॅक परीक्षेचे हिंदी व सायन्सचे पेपर फुटले, मग यावर राहुल गांधी मौन का बाळगून आहेत? काँग्रेसशासित राज्यांतील गोंधळावर बोलायला ते का घाबरतात, असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला.

( नक्की वाचा : धर्मेंद्र प्रधान यांनीच केलं होतं पेपरफुटीविरोधात आंदोलन, मोडली होती हाडं! जुन्या आंदोलनाची आज जोरदार चर्चा )
 

सरकार संसदेत चर्चा करण्यास पूर्ण तयार

विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत आणि त्यांच्या भविष्याची चिंता करणे ही केवळ सरकारचीच नाही, तर विरोधी पक्षाचीही तेवढीच मोठी जबाबदारी आहे, असे नड्डा यांनी स्पष्ट केले. राहुल गांधींनी संसदेत मांडलेल्या सर्व 150 पेपरफुटी प्रकरणांची योग्य ती चौकशी केली जाईल आणि सत्य देशासमोर आणले जाईल. 

या समस्येवर सर्वांनी एकत्र येऊन मार्ग काढण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार संसदेत या विषयावर सविस्तर आणि गंभीर चर्चा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, त्यामुळे विरोधकांनी वारंवार गोलपोस्ट बदलू नये, असे आवाहन त्यांनी केले.

( नक्की वाचा : Rahul Gandhi: चर्चेची अट मान्य करताच राहुल गांधी पलटले; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा गंभीर आरोप )
 

सोनम वांगचुक यांची भेट अन् उपोषण मागे घेण्याचे आवाहन

पत्रकार परिषदेदरम्यान जेपी नड्डा यांनी लडाखमधील समाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबतही महत्त्वाची माहिती दिली. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या वांगचुक यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचे त्यांनी सांगितले. वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती नड्डा यांनी केली. तसेच वांगचुक यांनी लिहिलेल्या खुल्या पत्राला सरकार योग्य ते उत्तर देईल आणि लडाखशी संबंधित सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com