उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्युसमध्ये लघवी मिक्स करुन विकणाऱ्या दुकानदाराला नागरिकांनी चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्युस विक्रेता आणि त्याच्या मुलाला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. आमीर आणि साबीर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
आमीर खानचा आणि त्याचा मुलगा साबीर खान हे ज्युस कॉर्नर चालवतात. शुक्रवारी संध्याकाळी इंद्रपुरी येथे राहणारा एक ग्राहक आमीरच्या दुकानात पोहोचला. आमीरने ज्यूसमध्ये लघवी मिसळून प्यायला दिल्याचा आरोप या ग्राहकाने केला. यानंतर लोकांनी आमीरला बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ज्यूसच्या दुकानात लोकांना ज्यूसच्या नावाखाली मानवी मूत्र दिल्याचा लोकांना संशय होता. लोकांना ज्युसमध्ये विचित्र चव आणि वास येत होता. लोकांनी चौकशी केली त्यावेळी दुकांना ठेवलेली लघवीची बाटली देखील सापडली. यावेळी स्थानिक लोकांनी दुकान मालकाला रंगेहाथ पकडून बेदम मारहाण केली.
लोकांनी सांगितलं की, मारहाणीदरम्यान दुकान मालकाने कबूल केले की त्याने बाटलीमध्ये लघवी ठेवली होती जेणेकरून तो ज्युसमध्ये मिसळू शकेल. स्थानिक लोकांनी याचा व्हिडिओ बनवून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. एसीपी अंकुर विहार भास्कर वर्मा यांनी सांगितले की, घटनास्थळावरून ज्यूसच्या दुकानातून एक लिटरच्या बाटलीत भरलेले मूत्र जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. ज्यूस आणि मानवी लघवीचे नमुनेही तपासणीसाठी पाठवले जात आहेत.