Dubare Camp : हत्तींना जवळून पाहण्याचा आनंद वेदनेत बदलला! दुबारे कॅम्पमधील महिला पर्यटकाचा चिरडून मृत्यू

या भयाण घटनेनंतर हत्ती कॅम्पमध्ये नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. अनेक बाबतीत पर्यटकांवर निर्बंध लादण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Karnataka Elephant Camp Accident : कर्नाटकच्या कोडागु जिल्ह्यात घडलेल्या वेदनादायी घटनेनंतर सरकारने कडक पावलं उचलली आहेत. कर्नाटकातील दुबारे हत्ती कॅम्प हे पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र आहे. कुर्गला आलेले पर्यटक आवर्जुन दुबारे हत्ती कॅम्पला उपस्थिती लावतात. येथे हत्तींसोबत दिवस साजरा करतात. या पर्यटनादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुबारे हत्तीच्या कॅम्पमध्ये एका महिला पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. यापुढे हत्तींच्या जवळ जाणं, त्यांना आंघोळ घालणं, खाऊ घालणं किंवा त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या घटनेमुळे जंगल पर्यटनात सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. 

कसा झाला हा अपघात?

दुबारे हत्ती कॅम्पमध्ये ही घटना घडली. चेन्नईची राहणारी ३३ वर्षीय ज्यूनेश हत्तींना आंघोळ घालताना पाहत होती. त्यादरम्यान अचानक दोन हत्तींमध्ये वाद सुरू झाला. कंचन नावाच्या हत्तीने मार्तंडा नावाच्या हत्तीवर हल्ला केला. यादरम्यान परिस्थिती इतकी बिघडली की, एका हत्तीचं संतुलन बिघडलं आणि तो महिलेच्या अंगावर पडला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये शेजारी उभा असलेला पुरुष तिला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. 

Advertisement

हत्तीच्या अंगाखाली आल्याने महिलेचा मृत्यू...

अवाढव्य हत्ती महिलावर कोसळला. यादरम्यान महिला हत्तीच्या अंगाखाली चिरडली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, स्वत:ला उचलण्याच्या प्रयत्नात महिला हत्तीखाली अधिक दबली गेली. ज्यामुळे तिचा जागेवरच मृत्यू झाला. दुसरीकडे महावते दोन्ही हत्तींवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. 

नक्की वाचा - Pune News : ना पेट्रोल दरवाढीची भीती, लांबच लांब रांगाही नको; पुण्याचा शेतकरी 'प्रवासा'तून देतोय अनोखा संदेश

१०० फूट अंतरावर पर्यटकांना उभं राहता येणार...

या अपघातानंतर कर्नाटक सरकारने तातडीने कडक पावलं उचलली आहेत. वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर बी. खांड्रे यांनी सर्व हत्ती कॅम्पमध्ये सुरक्षा नियम कडक करण्याचे आदेश दिले आहेत. नव्या आदेशानुसार, आता पर्यटक हत्तींना १०० फुटावरुन पाहून शकतील. कोणत्याही  पर्यटकाला हत्तीच्या जवळ जाण्यास परवानगी नसेल. सर्व नियम कॅम्पमध्ये अनिवार्यपणे लागू करण्यात येतील. 

Advertisement


सेल्फी घेण्यास आणि खाऊ घालण्यास बंदी...

सरकारने हत्तींसोबत सेल्फी घेणं आणि त्यांना खाऊ घालण्यास पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. आतापर्यंत पर्यटक येथील हत्तींना केळं, गूळ आणि ऊस खाऊ घालू शकत होते. मात्र आता यावर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. आतापासून हत्ती कॅम्पसाठी नवे एसओपी तयार केले जातील. याशिवाय जंगलातील ट्रेकिंगवरही सध्या बंदी आणण्यात आली आहे. वाइल्डलाइफ टुरिजममध्ये छोटा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो.