अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune News : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाईट गावातील शेतकरी शंकर खेंगले सध्या त्यांच्या अनोख्या जीवनशैलीमुळे चर्चेत आले आहेत. आधुनिक काळात जिथे प्रत्येक जण महागड्या गाड्या आणि इंधनावर अवलंबून असलेल्या जीवनशैलीकडे झुकताना दिसतो, तिथे शंकर खेंगले मात्र रोजच्या प्रवासासाठी घोड्याचा वापर करत आहेत. एकीकडे वाढते पेट्रोलचे दर, ग्रामीण भागातील खराब रस्ते आणि दुसरीकडे पारंपरिक शेतीवरील त्यांचा विश्वास यामुळे त्यांनी हा वेगळा मार्ग निवडला आहे.
शंकर खेंगले केवळ घोड्यावरून प्रवास करत नाहीत, तर देशी गोवंश संवर्धन आणि पारंपरिक शेती जपण्याचं कामही करत आहेत. विशेषतः महाराष्ट्राच्या खिल्लार गाईच्या संगोपनासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आहे. ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रांपेक्षा बैल आणि गो-पालनावर आधारित शेतीच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवते, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
कीर्तन, धार्मिक कार्यक्रमांसाठी घोड्यावरुन प्रवास...
मुंबईतील धकाधकीचे जीवन सोडून त्यांनी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला आणि साधी, निसर्गाशी जोडलेली जीवनशैली स्वीकारली. कीर्तन, प्रवचन किंवा धार्मिक कार्यक्रमांसाठीही ते अनेकदा घोड्यावरूनच प्रवास करतात. काहीजण त्यांच्या या जीवनशैलीची खिल्ली उडवतात. मात्र अनेकांकडून त्यांच्या पर्यावरणपूरक आणि मातीशी नाळ जोडणाऱ्या विचारांचं कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच इंधन बचतीचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर शंकर खेंगले यांची जीवनशैली चर्चेचा विषय ठरत आहे. इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि देशी वंश संवर्धनाचा संदेश देणारा त्यांचा घोड्यावरून होणारा प्रवास ग्रामीण भागात प्रेरणादायी ठरत आहे. शंकर धोंडीबा खेंगले यांनी आधुनिक दिखाऊ जीवनशैलीपेक्षा पारंपरिक मूल्ये आणि ग्रामीण संस्कृती जपण्याचा मार्ग निवडत एक वेगळाच आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world