कर्नाटकमधील एका 32 वर्षीय महिलेने पतीसोबत झालेल्या भांडणानंतर आपल्या सहा वर्षीय दिव्यांग मुलाला मगरींच्या तोंडी फेकल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. हृदयाचा ठोका चुकवणारी ही घटना दांडेली तालुक्यामध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोधमोहीमेच्या एक दिवसानंतर कालव्यातून मुलाचा मृतदेह सापडला.
वादामागील नेमके कारण काय?
"या दाम्पत्याचा मोठा मुलगा दिव्यांग होता. यावरूनच दोघांमध्ये अनेकदा भांडण होत असे. या दाम्पत्यास आणखी एक दोन वर्षांचा मुलगा देखील आहे", असे पोलिसांनी सांगितले.
(नक्की वाचा : दाभोसा धबधब्यावर स्टंट करणे बेतले जीवावर, 120 फूट खोल डोहात उडी मारल्याने पर्यटकाचा मृत्यू)
नेमकी काय आहे घटना?
सावित्री आणि रवी कुमार असे या दाम्पत्याचे नाव आहे. या दाम्पत्यामध्ये त्यांच्या मोठ्या मुलावरून सातत्याने वाद होत असत. कारण त्यांचा मुलगा दिव्यांग होता. सावित्रीने पोलिसांना सांगितले की, पती नेहमी मुलावरून टोमणे मारायचा आणि दिव्यांग मुलाला का जन्म दिला?, असा प्रश्न सतत विचारायचा.
सावित्रीने पुढे असेही सांगितले की, "माझा पतीच घडलेल्या घटनेस जबाबदार आहे. मुलाला मरू दे, तो केवळ खाण्याचे काम करतोय; असेही तो वारंवार म्हणायचा. नवरा सतत हेच टोमणे ऐकवेल तर माझ्या मुलाने किती अत्याचार सहन करावे? आणि मी माझे दुःख कोणासमोर व्यक्त करू?"
(नक्की वाचा: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप, गुन्हा दाखल)
मुलाचे काय झाले? पती-पत्नीला अटक, कारण...
शनिवारी ( 4 मे 2024) याच मुद्यावरून पुन्हा वाद झाले आणि यानंतर सावित्रीने मुलाला एका कालव्यामध्ये फेकले. जेथे मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे म्हटले जात आहे. घडल्या प्रकाराबाबत शेजाऱ्यांनी पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने मुलाला वाचवण्यासाठी शोधमोहीम सुरू केली. पण अंधारामुळे शोधमोहीमेत अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे मुलाचा शोध घेणे शक्य नव्हते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, "रविवारी सकाळी जखमी अवस्थेत मुलाचा मृतदेह सापडला. मगरींच्या हल्ल्यामध्ये मुलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते".
याप्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीला अटक करून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
(नक्की वाचा: केस ओढले-कपडे फाडले, मुख्याध्यापिका-शिक्षिकेमध्ये फ्री स्टाइल हाणामारी; VIDEO VIRAL)