सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादात आणि कोणत्याही सत्यतेशिवाय एखाद्याला दोषी ठरवण्याच्या प्रवृत्तीने एका व्यक्तीचा बळी घेतला आहे. केरळमधील कोझिकोड येथील एका कापड गिरणी कामगाराने सोशल मीडियावरील द्वेष आणि मानहानीला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. केवळ २६ सेकंदांच्या एका व्हिडिओने एका व्यक्तीला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले, ज्यामुळे डिजिटल बेजबाबदारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
16 जानेवारी रोजी सिमजिथा मुस्तफा नावाच्या एका महिला इन्फ्लुएंसरने गर्दीच्या बसमध्ये प्रवास करताना एक 26 सेकंदांचा सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये तिने आरोप केला की, शेजारी उभे असलेले दीपक यू हे बसमधील गर्दीचा फायदा घेऊन तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होते.