Lalu Prasad Yadav's Grandson Aditya Joins Singapore Military : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मोठा नातू आदित्य सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचा म्हणजेच रोहिणी आचार्य यांचा मुलगा आदित्य याने लष्करी गणवेश परिधान केला असून तो आता सिंगापूरमध्ये लष्करी प्रशिक्षण घेणार आहे.
आई रोहिणी आचार्य यांनी व्यक्त केला अभिमान
आदित्यच्या या निर्णयाबद्दल त्याची आई रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या मुलाचा उल्लेख 'धाडसी आणि शिस्तप्रिय' असा केला आहे. रोहिणी यांनी म्हटले आहे की, प्री-युनिव्हर्सिटीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अवघ्या 18 वर्षांच्या वयात आदित्यने दोन वर्षांच्या बेसिक मिलिटरी ट्रेनिंगसाठी (BMT) जाण्याचा निर्णय घेतला.
मुलाच्या या धाडसाने माझे हृदय अभिमानाने भरून आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खऱ्या योद्ध्यांची जडणघडण ही आयुष्यातील कठीण संघर्षांतूनच होते, असेही त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
आज मेरा दिल गर्व से भरा हुआ है , आज अपनी प्री - यूनिवर्सिटी ( Pre - University ) की पढ़ाई पूरी करने के बाद 18 साल की उम्र में हमारा बड़ा बेटा आदित्य 2 साल की Basic Military Training के लिए गया है ..
— Rohini Acharya (@RohiniAcharya2) January 5, 2026
आदित्य .. तुम बहादुर , साहसी और अनुशासन के साथ रहने वाले हो, जाओ कमाल कर दिखाओ… pic.twitter.com/itVx1DPQWi
काय आहे हे बेसिक मिलिटरी ट्रेनिंग?
आदित्यने घेतलेले हे प्रशिक्षण सिंगापूरच्या नॅशनल सर्व्हिस (NS) अंतर्गत येते. बेसिक मिलिटरी ट्रेनिंग (BMT) हा लष्करी सेवेचा पाया मानला जातो. याद्वारे तरुणांमध्ये शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती, टीमवर्क आणि नेतृत्वगुण विकसित केले जातात.
या प्रशिक्षणादरम्यान तरुणांना शस्त्रास्त्रांची हाताळणी, मैदानी कवायती, कठीण शारीरिक व्यायाम आणि लष्करी नीतिमत्तेचे धडे दिले जातात. हे प्रशिक्षण अत्यंत खडतर असते आणि त्यातील कामगिरीच्या आधारावरच पुढे त्यांची नियुक्ती आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये केली जाते.
( नक्की वाचा : Rohini Acharya: लालूंना किडनी देणाऱ्या रोहिणी आचार्यांवर तेजस्वींनी चप्पल का फेकली? 'यादवी' ची Inside Story )
सिंगापूरमध्ये लष्करी प्रशिक्षण बंधनकारक का?
अनेकांना प्रश्न पडला आहे की आदित्यने परदेशी सैन्यात का प्रवेश केला? मात्र, हे ऐच्छिक नसून सिंगापूरच्या कायद्यानुसार अनिवार्य आहे. सिंगापूरमध्ये प्रत्येक पुरुष नागरिकाला आणि दुसऱ्या पिढीतील कायमस्वरूपी रहिवाशांना (Permanent Residents) वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षे पूर्णवेळ लष्करी सेवा देणे कायद्याने बंधनकारक आहे.
रोहिणी आचार्य गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबासह सिंगापूरमध्ये स्थायिक आहेत, त्यामुळे आदित्यला या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.
दोन वर्षांनंतरही जबाबदारी कायम
आदित्यला पुढील दोन वर्षे हे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. ही सेवा पूर्ण केल्यानंतरही तो पूर्णपणे मोकळा होत नाही. वयाची 40 ते 50 वर्षे होईपर्यंत त्याला राखीव सैनिक (Reservist) म्हणून ठराविक काळासाठी आपली सेवा देत राहावी लागणार आहे. सिंगापूरमध्ये हा नियम अत्यंत कडक असून त्यातून कोणालाही सवलत मिळत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world