Law Stories : बायकोला पाळी येत नाही म्हणून घटस्फोटाची मागणी; 'क्रूरते'अंतर्गत अर्ज दाखल, कोर्ट काय म्हणालं?

बायकोला पिरियड्स न येणं किंवा मूल होत नसेल तर पतीसाठी ही क्रूरता असू शकते का? 

जाहिरात
Read Time: 3 mins

Law Stories : आजही कौटुंबिक न्यायालयात लाखो घटस्फोटाची प्रकरणं प्रलंबित आहेत. लग्न करणं जितकं सोपं असतं, त्याहून कित्येक पटीने कठीण घटस्फोटाची प्रक्रिया असते. घटस्फोटासाठी विचित्र कारणं दिल्याच्याही अनेक घटना पाहायला मिळतात. मात्र काही घटस्फोटाची प्रकरण अशीही असतात ज्यामुळे सामाजिक विषयावर वाचा फोडली जाते. 

'ऑर्डर ऑर्डर पॉडकास्ट'मधून अॅड. मधुरा देशपांडे यांनी घटस्फोटाची एक केस सविस्तरपणे मांडली. यामध्ये एका पतीने आपल्या पत्नीला पाळी येत नाही म्हणून घटस्फोटाची मागणी केली. मात्र यासाठी त्याने कायद्याच्या भाषेत 'क्रूरता' या तरतुदीची मदत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बायकोला पिरियड्स न येणं किंवा मूल होत नसेल तर पतीसाठी ही क्रूरता असू शकते का? 

पत्नीला पिरियड्स येत नाही, पतीकडून क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटाची मागणी...

एका पतीने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आपल्या पत्नीला पिरियड्स येत नाही आणि हे लग्नापूर्वी माहिती नसल्याचा त्याचा दावा होता. पत्नीला पिरियड्स येत नसल्याने तिला मूल होऊ शकत नाही, हिंदू विवाह कायदा १९५५ च्या कलम १२ (१) (ia) नुसार, क्रूरतेच्या आधारावर त्याने घटस्फोटाची मागणी केली होती. ही केस दाखल झाल्यानंतर कोर्टाने पत्नीला नोटीस पाठवली. यानंतर पत्नी कोर्टात हजर झाली. 

Advertisement

पत्नीने वेगळच चित्र केलं उघड...

पत्नीने तिला पिरियड्स येत नसल्याचं मान्य केलं. मात्र याबाबत तिच्या पतीला लग्नाआधीच कल्पना होती. पतीने पिटिशनमध्ये हे लव्ह मॅरेज असल्याचं लपवलं होतं. याशिवाय लग्नापूर्वीही त्यांच्यामध्ये शरीरसंबंध आले होते. पिरियड्स येत नसल्याचं लग्नापूर्वीच पतीला माहित होतं. त्यामुळे ही फसवणूक नसल्याचं पत्नीने सांगितलं. 

३ ते ४ वर्षे कोर्टशीपमध्ये..

गेल्या अनेक वर्षांपूर्वी ते एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात लग्नापूर्वीच शरीरसंबंध आले होते. त्यामुळे इतकं जवळचं नातं असतानाही पिरियड्स बाबत तरुणाला माहीत नसेल हे खटकणारं होतं. पतीच्या मित्राशीही बोलण्यात आलं. तोदेखील सुरुवातीपासून पतीसोबत क्रूरता झाल्याचं सांगत होतं. शेवटी त्यानेही हे लव्ह मॅरेज असल्याचं मान्य केलं. तीन ते चार वर्षांत अनेकदा त्यांचे शरीरसंबंध झाले होते. विशेष म्हणजे पतीचा मित्र त्यांना भेटण्यासाठी स्वत:चा मोकळा फ्लॅट देत होता.

नक्की वाचा - Law Stories : आधीच विवाहित, नवरा बेपत्ता, मुलीसोबत आईचंही अफेयर; डोकं चक्रावून टाकणारं प्रकरण

लग्नानंतर नेमकं काय घडलं?

पत्नीने सांगितलं की, लग्नानंतर पहिले काही दिवस सर्व सुरळीत होतं. मात्र पतीच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप वाढू लागला तसा आमच्यात वाद सुरू झाले. मुलीला पिरियड्स येत नसल्यामुळे तिला मूल होऊ शकत नाही, आणि तिला मूल होऊ शकत नसेल तर आपल्या वंशाचा दिवा कसा वाढणार, असा प्रश्न पतीचे आई-वडील वारंवार उपस्थित करू लागले.  अशी मुलगी घरात असून उपयोग काय? तिला घटस्फोट दे आणि तू दुसरं लग्न कर अशी सूचना ते आपल्या मुलाला देत होते. त्यांच्या दबावाला बळी पडून पतीने पत्नीला त्रास द्यायला सुरुवात केली.  

हिंदू विवाह कायदा १९५५ च्या कलम १२ (१) (ia) नुसार, एखाद्या दाम्पत्यामध्ये शारीरिक किंवा मानसिक पातळीवर इतकी क्रूरता होते की, ज्यात पती किंवा पत्नी एकत्र राहू शकत नाही. मात्र येथे कोणत्याच प्रकारची क्रूरता नव्हती. याशिवाय फसवणूकही नव्हती. यानंतर न्यायालयाने क्रूरतेच्या अंतर्गत दाखल केलेली केस रद्द केली. एखाद्या स्त्रीला पिरियड्स येत नसेल किंवा मूल होत नसेल तर ही पतीविरोधात क्रूरता असू शकत नाही असं अॅड. मधुरा देशपांडे यांनी सांगितलं. त्यामुळे न्यायालयाने पत्नीच्या बाजूने निर्णय दिला. 

Advertisement

(वरील लेख सोशल मीडियावर व्हिडिओवर आधारित आहे. NDTV मराठी यातून कोणताही दावा करीत नाही.)