Lucknow Coaching Fire: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एक हृदय हेलवणारी घटना घडली आहे. येथील अलिगंज भागातील एका तीन मजली इमारतीमध्ये लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत तब्बल 15 जणांचा होरपळून आणि गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोजच्यासारखेच विद्यार्थी या इमारतीमधील कोचिंग सेंटरमध्ये अभ्यासासाठी आले होते. मात्र, काही सेकंदांतच या आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर एका भीषण काळकोठडीत झाले. जिन्यांवर आगीचे तांडव आणि खोल्यांमध्ये गुदमरवणारा काळा धूर पसरल्यामुळे जिवाच्या आकांताने अनेक विद्यार्थ्यांनी खिडक्यांमधून थेट रस्त्यावर उड्या मारल्या, तर काहींनी स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले.
अलिगंज येथील उषा मेहता मार्गावर असलेल्या एका तीन मजली व्यावसायिक संकुलात सोमवारी दुपारी ही आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर प्राण्यांचे दुकान (पेट शॉप) होते, तर पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर कोचिंग इन्स्टिट्यूट, कॉम्प्युटर लायब्ररी आणि गेमिंग झोन सुरू होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण ती खालच्या भागातून सुरू होऊन वरच्या मजल्यांकडे वेगाने पसरली. यामुळे खाली उतरण्याच्या अरुंद पायऱ्या आणि जिने पूर्णपणे धूर आणि आगीच्या विळख्यात सापडले, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला.
जिवाच्या आकांताने खिडक्यांमधून मारल्या उड्या
खोल्यांमध्ये प्रचंड धूर भरल्याने श्वास घेणे अशक्य झाल्यावर विद्यार्थ्यांनी स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी खिडक्यांच्या काचा तोडून थेट खाली उड्या मारण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर या घटनेचे काही अंगावर काटा आणणारे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये तरुण पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरून खाली पडताना दिसत आहेत. काही विद्यार्थ्यांनी शेवटचा पर्याय म्हणून बाथरूमचा आसरा घेतला आणि स्वतःला आत बंद करून घेतले. मात्र, व्हेंटिलेशन नसल्यामुळे आणि संपूर्ण इमारतीत विषारी धूर पसरल्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.
( नक्की वाचा : Ayodhya Ram Mandir: अयोध्येत थेट रामललाचा हार आणि चरण पादुकाच चोरीला? SIT च्या चौकशीत मोठे खुलासे )
भीषण दुर्घटनेनंतर नातेवाईकांचा आक्रोश
या दुर्घटनेनंतर घटनास्थळी पालकांचा आणि नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला. शकील अहमद नावाच्या एका तरुणाने सांगितले की, त्याचा लहान भाऊ आत अडकला होता आणि त्याचा शेवटचा मेसेज आला होता की तो धूर आणि आगीपासून वाचण्यासाठी वॉशरूमच्या दिशेने पळत आहे.
अग्निशामक दलाची वाहनं घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी प्रचंड धाडस दाखवले. त्यांनी छताला आणि छज्जाला लटकणाऱ्या विजेच्या तारांच्या मदतीने 5 ते 6 विद्यार्थ्यांना ओढून खाली काढले, तर वरून उड्या मारणाऱ्या मुलांना झेलण्याचा प्रयत्न केला.
भिंत तोडून कर्मचारी आत घुसले
घटनेची माहिती मिळताच दमकलच्या 14 वाहनं तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. इमारतीमध्ये प्रचंड धूर असल्यामुळे मदतकार्यात मोठे अडथळे येत होते. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी शेजारील इमारतीची भिंत तोडून आत प्रवेश केला आणि एक्झॉस्ट फॅन लावून आत अडकलेल्या 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले.
सर्व जखमींना तातडीने किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या (केजिमयु) ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण भीषण दुर्घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world