मध्य प्रदेशमधील व्यावसायिकाने आपल्या पत्नीसह आत्महत्या केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सीहोर आणि इंदूर येथील त्यांच्या मालमत्तांची झडती घेतल्याच्या आठवडाभरातच दाम्पत्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. यावरुन भाजप आणि काँग्रेस आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
ईडीने 5 डिसेंबर रोजी उद्योगपती मनोज परमार आणि त्याची पत्नी नेहा यांच्या इंदूर आणि सीहोरमधील चार ठिकाणांवर धाड टाकत झडती घेतली होती. पंजाब नॅशनल बँकेच्या 6 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी मनोज परमार यांची चौकशी सुरू होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ईडीच्या छाप्यांमध्ये, अधिकाऱ्यांनी गोठवलेल्या बँक खात्यातील 3.5 लाख रुपयासह जंगम आणि जंगम मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त केली होती. त्यानंतर लगेचच मनोज परमार यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासूनच ते तणावाखाली होते.
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधींची भेट
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान मनोज परमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तेव्हा पासून ते प्रकाशझोतात आले होते. परमार यांना यावेळी राहुल गांधी यांना छोटी भेट देखील दिली होती.
(नक्की वाचा- अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य करणारी महिला कॉन्स्टेबल अटकेत, भोंदू बाबाच्या टोळीशी कनेक्शन उघड)
परमार यांच्या सुसाईड नोटमध्ये काय?
मनोज परमार यांनी आत्महत्येआधी सुसाईड नोटदेखील लिहिली आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांनी ईडीचे सहाय्यक संचालक संजीत कुमार साहू यांच्यावर छापेमारीत छळ, शारीरिक हल्ला आणि तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. साहू यांनी मनोज परमार यांना त्यांच्या मुलांना भाजपमध्ये सामील करण्यास आणि राहुल गांधींविरोधात वक्तव्ये करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप या चिठ्ठीत करण्यात आला आहे.
"त्यांनी माझ्या घरातून 10 लाख रुपये, दागिने आणि मूळ कागदपत्रे घेतली. मला बनावट स्टेटमेंट्सवर सह्या करण्यास भाग पाडण्यात आले आणि माझा फोन देखील जप्त करण्यात आला. मी ऐकलं नाहीतर मला इतर प्रकरणांत अडकवण्याची धमकी अधिकाऱ्याने दिली", असे मनोज परमार यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
(नक्की वाचा- शाहरुख खानच्या त्या गोष्टीमुळे अल्लु अर्जुनची जेलमधून सुटका, जाणून घ्या INSIDE STORY)
राहुल गांधींना मुलांची काळजी घेण्याचे आवाहन करून परमार यांनी या चिठ्ठीचा शेवट केला आहे. परमार दाम्पत्याच्या पश्चात 18, 16 आणि 13 वर्षांची तीन मुले आहेत. पोलीस अधीक्षक दीपक शुक्ला यांनी सुसाईड नोट सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा देत सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले.
काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप
मनोज परमार यांच्या आत्महत्येनंतर काँग्रेस नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. "ही आत्महत्या नाही, हत्या आहे," असं म्हणत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मागणी केली की, "परमार यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या घटनांचा तपास केला पाहिजे." काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी यांनीही राजकीय छळाचा आरोप करत ईडीकडून निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली.
भाजपचे मध्य प्रदेश माध्यम प्रभारी आशिष अग्रवाल यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. "काँग्रेस राजकीय फायद्यासाठी या दु:खद घटनेचा फायदा घेत आहे. हे दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे."