Mahakumbh Parv 2025 : हिंदू धर्मात मोठं महत्त्व असलेला महाकुंभ मेळा 13 जानेवारी (पौष पौर्णिमा) रोजी सुरु होत आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये याचं आयोजन होणार आहे. दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिकमध्ये कुंभमेळा होता. यंदाच्या कुंभमेळ्याचा समारोप 26 फेब्रुवारी रोजी होईल.
महाकुंभ मेळा हिंदू धर्मावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा उत्सव आहे. या उत्सवाच्या दरम्यान प्रयागराजमधील गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी जगभरातील भाविक एकत्र येतात. कुंभ मेळ्यात या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्याची भाविकांची इच्छा असते.
एक महिना चालणाऱ्या या महापर्वाच्या काळात काही महत्त्वाच्या तिथी आहेत. त्या दिवशी कुंभमेळ्यात स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्ही देखील कुंभमेळ्यात जाण्याचं नियोजन करत असाल तसंच एक भाविक म्हणून तुम्हाला या काळात होणाऱ्य़ा शाही स्नानची माहिती हवी असेल तर तुम्हाला ही सर्व माहिती आम्ही देणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
13 जानेवारी 2025 - पौष पौर्णिमा
पौष पौर्णिमेच्या दिवशी कुंभ स्नान करणाऱ्या व्यक्तीची सर्व पापं धुतली जातात, अशी समजूत आहे. या दिवशी गंगा, यमुना तसंच अन्य पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर सर्व पाप नष्ट होता आणि पुण्य प्राप्ती होते. हा दिवस मोक्ष प्राप्तीसाठी देखील योग्य मानला जातो.
14 जानेवारी 2025 - मकर संक्रांती
या दिवशी सूर्य देवता धनू राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करते. या दिवसाला मकर संक्राती म्हणून ओळखलं जातं. या दिवशी स्नान, दान, जप आणि धार्मिक अनुष्ठान करण्याचं विशेष महत्त्व आहे. विशेषत: या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे. या दिवशी तीळ दान करणे, यज्ञ करणे शुभ मानले जाते.
( नक्की वाचा : भारतीयांना 3 मुलांची आवश्यकता आहे? सरसंघचालकांच्या इशाऱ्यावर तज्ज्ञ काय म्हणतात? )
29 जानेवारी 2025 - मौनी आमवस्या
मौनी अमवस्या हा माघ महिन्यातील कुंभ स्नान करण्याचा सर्वात मोठा दिवस आहे. या दिवशी केलेलं स्नान सर्वोत्तम मानले जाते. या दिवशी पुण्यकाळात स्वत:साठी तसंच पितरांसाठी दान, स्नान करणे फलदायी समजले जाते. या स्नानाचं वर्णन शास्त्रामध्येही आहे. या तिथीला कुंभ स्नान करुन तुम्ही पुण्य प्राप्त करु शकता.
3 फेब्रुवारी 2025 - वसंत पंचमी
वसंत पंचमीच्या दिवशी केलेले कुंभ स्नानही शुभ समजले जाते. या दिवशी दान करणाऱ्यांच्या जिभेवर सरस्वती निवास करते, असं मानलं जातं.
( नक्की वाचा : यंदा कर्तव्य आहे? लग्नाच्या तारखांची यादी समोर, 5 महिन्यात 42 मुहूर्त )
12 फेब्रुवारी 2025 - माघ पौर्णिमा
माघ पौर्णिमा कुंभ मेळ्यात स्नान करण्याची शेवटची आणि महत्त्वाची तिथी आहे. या दिवशी स्नान, ध्यान केल्यानंतर सर्व मनोकामना पूर्ण होतात, तसंच मोक्ष प्राप्त होतो.
26 फेब्रुवारी 2025 - महाशिवरात्र
महाशिवरात्रीच्या दिवशी कुंभमेळ्याचा समारोप होईल. या दिवशी शिव-पार्वतीचे स्मरण करुन स्नान, ध्यान, पूजन, उपासना आणि व्रत केल्यानंतर तुमच्यावर शंकर आणि पार्वतीचा आशिर्वाद कायम राहतो. हे व्रत केल्यानंतर आत्मिक समाधान मिळतं.
( स्पष्टीकरण : ही माहिती धार्मिक समजुती आणि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. NDTV नेटवर्क याची खात्री देत नाही. )