उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या चेंगराचेंगरीमध्ये 10 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मौनी अमावस्येनिमित्त अमृतस्नान करण्यासाठी गर्दी झाल्याने ही दुर्घटना घडली. दरम्यान, महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची ही दुर्घटना पहिली नाही, याआधीही कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरीच्या मोठ्या दुर्घटना घडल्या होत्या. त्यामध्ये मौनी अमावस्येच्यादिवशी 3 फेब्रुवारी 1954 मध्ये प्रयारराजमध्ये झालेली दुर्घटना सर्वात भयंकर होती, ज्यामध्ये एका खवळलेल्या हत्तीमुळे 500 भाविकांचा मृत्यू झाला होता.
तारीख होती 3 फेब्रुवारी 1954. ते ठिकाण प्रयागराज (तेव्हाचे अलाहाबाद) होते. मौनी अमावस्येच्या निमित्ताने लाखो भाविक अमृत स्नानासाठी आले होते. यावेळी ही प्रचंड चेंगराचेंगरी झाली होती. स्वतंत्र भारतातील या पहिल्या कुंभमेळ्यात एक हत्ती नियंत्रणाबाहेर गेल्याने ही दुर्घटना घडली. लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावल्याने सर्वत्र गोंधळ उडाला. तब्बल 45 मिनिटांच्या या राड्यात 500 भाविकांचा मृत्यू झाला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंतप्रधान नेहरुंचा दौरा ठरला होता वादग्रस्त..
यावेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा दौराही वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या दौऱ्यामुले कुंभमेळ्यातील गर्दी वाढली तसेच त्यांच्यासाठी केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा कुंभमेळ्याच्या सुरक्षेवर परिणाम झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर बीबीसीने केलेल्या रिपोर्टमध्ये त्यांचा दौरा एक दिवस आधीच झाल्याचे म्हटले होते.
या दुर्घटनेनंतरच धार्मिक सोहळ्यांमधील गर्दी नियंत्रणासाठी विशेष नियम बनवण्यात आले. कुंभमेळ्याला येणाऱ्या लोकांना क्षणोक्षणी माहिती देण्यासाठी लाऊडस्पीकर बसवण्यास सुरुवात करण्यात आली. प्रकाशयोजनेकडेही विशेष लक्ष देण्यात आले. 1994 च्या घटनेनंतर, पंडित नेहरूंनी गर्दीच्या परिस्थिती टाळण्यासाठी दिवसा प्रमुख कुंभस्थळांना व्हीआयपी भेटी देण्यास बंदी घातली. यानंतर उत्तर प्रदेश सरकारने अनेक पावले उचलली आणि संगमजवळ तात्पुरती रुग्णालये आणि हरवलेल्या आणि सापडलेल्या बूथसह अनेक व्यवस्था केल्या.
नक्की वाचा - Mauni Amavasya 2025 : मौनी अमावस्या कधी आहे? त्या दिवशी मौनाचे धार्मिक आणि आध्यात्मिक फायदे काय?
नाशिकमधील चेंगराचेंगरी:
17 ऑगस्ट 2003 ला नाशिकच्या पवित्र रामकुंडावर साधू महंतांचे शाही स्नान पार पडणार होते. यावेळीही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. काळाराम मंदिराकडून सरदार चौकाच्या दिशेने जवळपास 25 हुन अधिक वाहने आणि हत्ती घेऊन साधू निघाले होते याचवेळी रामकुंड, सांडव्यावरची देवी परिसरातून हजारो भाविक उलट्या दिशेने काळाराम मंदिराकडे जात असताना सरदार चौक या अरुंद ठिकाणी गर्दी जमा झाली. साधूंनी यावेळी चांदीचे नाणे आणि चॉकलेट उधळल्याने भाविक गोळा झाले आणि हेच चेंगराचेंगरीचे कारण ठरले. यामध्ये 26 महिला आणि 3 पुरुष अशा 29 भाविकांचा मृत्यू होऊन शंभरहून अधिक जण यात जखमी झाले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world