Mauni Amavasya 2025 : पौष महिन्यातील अमावस्येला पौष अमावस्या किंवा मौनी अमावस्या असं म्हंटलं जातं. हिंदू धर्मात मौनी अमावस्येला मोठं महत्त्व आहे. यंदा ही अमावस्या 28 जानेवारीला संध्याकाळी सुरु होणार असून 29 जानेवारी रोजी देखील आहे. महाकुंभातील दुसरे शाही स्नान हे मौनी अमावस्येला होते. त्यामुळे या अमावस्येला मोठं महत्त्व आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मौनी अमावस्येचं महत्त्व
धार्मिक मान्यतांनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी पितरं जमीनीवर येतात. महाकुंभात स्नान करून पितरांना नैवेद्य दाखवून दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. ग्रहांच्या स्थितीनुसार ठरलेल्या अमृतस्नानाच्या तिथी अत्यंत शुभ आणि पुण्यकारक मानल्या जातात. मौनी अमावस्येला स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते, अशी समजूत आहे.
या दिवशी तर्पण, पिंडदान आणि दानाचे महत्त्व आहे. गरजूंना अन्न, वस्त्र, तीळ आणि तूप दान करणे शुभ असते. मौनी अमावस्येचा दिवस हा श्रद्धा, भक्ती आणि सेवेचा संदेश देतो.
( नक्की वाचा : Mahakumbh 2025 : महाकुंभ मेळ्यात कधी होणार शाही स्नान? वाचा संपूर्ण वेळापत्रक आणि महत्त्व )
मौनी अमावस्येचा कालावधी
2025 मधील मौनी अमावस्या मंगळवार 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी सुरु होत आहे. ती 29 जानेवारीला संध्याकाळी 6:05 वाजता संपेल. सूर्योदयानुसार अमावस्येची तिथी 29 जानेवारी आहे.
मौनाचे महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी मौन पाळलं तर आत्मा शांत होत. मौनामुळे मन केंद्रीत होते. त्याचा ध्यान आणि साधनेतही फायदा होतो. वेद काळापासूनच ऋषी-मूनी मौन, तपस्या हे अनिवार्य अंग असल्याचं सांगतात. मौन केल्यानं मन स्थिर होते. मनातील चलबिचल शांत होते. मौनाच्या माध्यमातून आत्मा आणि ब्रह्मांडामध्ये थेट संवाद होतो, अशी त्यांची समजूत आहे.
त्याचबरोबर मौन हा वाद विवाद, पाप आणि खोटेपणापासून वाचण्याचा मार्ग आहे. वेद आणि उपनिषदांमध्ये ब्रह्मचर्य, सत्य आणि संयम यांच्याशी मौनाचा संबंध असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
( नक्की वाचा : Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्याबाबत पाकिस्तानमध्ये सर्च का केले जात आहे? समजून घ्या खरा अर्थ )
मौन बाळगणाऱ्या व्यक्तींना स्वत:मध्ये डोकवण्याची तसंच आत्मपरिक्षण करण्याची संधी मिळते. त्यामुळे आत्म-ज्ञान तसंच आत्म-साक्षात्काराचा मार्ग प्रशस्त होतो. आत्मा पवित्र करण्याचं मौन हे साधन असल्याची वेद काळापासूनच समजूत आहे.
स्पष्टीकरण : या लेखातील संपूर्ण माहिती धार्मिक परंपरा आणि समजुतीवर आधारित आहे. NDTV नेटवर्क याची जबाबदारी घेत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world