PM Modi Speech : देशाचा 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून 12 व्यांदा देशवासीयांना संबोधित केले. विशेष म्हणजे, पंतप्रधानांचे ऐतिहासिक भाषण ऐकण्यासाठी 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 85 गावांच्या सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील सरपंचांनी या भाषणाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करत पंतप्रधानांचे कौतुक केले आहे, ज्यात ग्रामविकास आणि महिला सक्षमीकरणावर विशेष भर होता.
पंतप्रधानांच्या भाषणात ग्रामविकासावर जोर
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील सरपंच संदीप ढेरंगे यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाची विशेष प्रशंसा केली. ढेरंगे म्हणाले की, भाषणात कृषी, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या विषयांवर भर दिला होता, जे खूप महत्त्वाचे आहे. पंतप्रधानांनी गावच्या विकासाला देशाच्या विकासाचा पाया मानले, ही गोष्ट ऐकून त्यांना अभिमान वाटला. या भाषणातून त्यांना गावामध्ये नवीन गोष्टी लागू करण्याची प्रेरणा मिळाली. पंतप्रधान मोदींनी तरुणांसाठी 'विकसित भारत रोजगार योजना' जाहीर केल्यामुळे देशातील तरुणांना मोठा फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
( नक्की वाचा : PM Viksit Bharat Rojgar Yojana : देशभरातील तरुणांना कसे मिळणार 15 हजार? कुठे करणार अर्ज... वाचा सर्व माहिती )
महिला सक्षमीकरणावर विशेष लक्ष
महाराष्ट्रातील आणखी एक सरपंच डॉ. अनुप्रीता यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकून त्यांना खूप आनंद आणि अभिमान वाटला. भाषणात महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिल्याचे पाहून त्या भारावून गेल्या. 'एक महिला म्हणून महाराष्ट्रातून येताना, राष्ट्रनिर्माणात महिला योगदान देत आहेत हे ऐकून खूप छान वाटले,' असे त्यांनी नमूद केले.
ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा आनंद
या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने सरपंच अंजली यांनी आनंद व्यक्त केला. 'आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. पंतप्रधानांना थेट ऐकणे हा एक अभिमानास्पद क्षण होता,' असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रातील सरपंचांसाठी हा अनुभव विशेष होता कारण त्यांना देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. यावेळी, महाराष्ट्रातील सरपंचांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. 'व्हीव्हीआयपी' पाहुण्यांप्रमाणे मिळालेल्या आदरातिथ्यामुळे ते भारावून गेले.