श्रीरामाच्या नामस्मरणामध्ये अफाट शक्ती आहे. रामनामाचा जप केल्यानंतर दरोडेखोर वाल्याचा वाल्मिकी बनला. या वाल्मिकी ऋुषींनी रामायण लिहिलं, असं मानलं जातं. मध्य प्रदेशमधल्या उज्जैनमध्येही असाच एक प्रसंग घडलाय. येथील एका गुन्हेगाराचं रामायण वाचून ऱ्हदय परिवर्तन झालं. त्यानं आईला स्वत:च्या कातड्यापासून बनवलेली चप्पल भेट दिली.
रौनक गुर्जर असं या गुन्हेगाराचं नाव आहे. उज्जैनमधल्या सांदिपानी नगरमधील आखाडा मैदानात सात दिवसांच्या भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार गुर्जरच्या पायावर पोलिसांनी गोळी झाडली होती. त्याला पायाच्या त्या भागावरील कातडे हटवण्यासाठी ऑपरेशन करावे लागेल. त्यानं हे कातडं एका कुशल कारागिराला दान दिले. त्यापासून त्यानं ही खास चप्पल बनवली आहे.
आपल्याला ही प्रेरणा कशी मिळाली? याबाबत गुर्जरनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे, ' मी नियमितपणे रामायण वाटचो. श्रीरामाच्या चरित्राचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला आहे. आपल्या त्वचेपासून चप्पल बनवली तरी ते आईसाठी पुरेसं नाही, असं श्रीरामांनी सांगितलं होतं. त्यावेळी मला आपल्या त्वचेपासून चप्पल तयार करुन ते आईला भेट देण्याचा निर्णय मी घेतला.'
'आई-वडीलांच्या पायातच स्वर्ग आहे, हे मला जगाला सांगायचं आहे. वडील हे स्वर्गाची शिडी असून आई तुम्हाला तिथपर्यंत पोहचवते,' असं गुर्जरनं पुढं सांगितलं. याबाबतच्या वृत्तानुसार जितेंद्र महाराजांच्या नेतृत्त्वात झालेल्या भागवत कथा कार्यक्रमात गुर्जरनं त्याच्या आईच्या पायात ही खास चप्पल घातली.
गुर्जरच्या या प्रेमामुळे त्याची आई चांगलीच भारावली आहे. 'रौनक माझा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. देवानं सर्व संकटांपासून त्याचं संरक्षण करावं. तसंच त्याला आनंदी आयुष्य जगता यावं,' असा आशिर्वाद द्यावा,' अशी भावना त्याच्या आईनं व्यक्त केली.