India GDP Growth Rate : कृषी आणि सेवा क्षेत्राची चांगली कामगिरी, चौथ्या तिमाहीत GDP 7.4 टक्क्यांवर

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) अंदाजानुसार, 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) 6 टक्क्यांहून अधिक वेगाने विकास करणारी एकमेव अर्थव्यवस्था असेल. तसेच, अमेरिकेच्या व्यापार शुल्कामुळे (US Tarrif) जगातील अर्थव्यवस्थांमध्ये चढ-उतार होत असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed

2024-25 च्या चौथ्या तिमाहीत भारताचा जीडीपी विकास दर 7.4% वर पोहोचला, कृषी, बांधकाम आणि सेवा क्षेत्रांच्या मजबुतीमुळे. आर्थिक वर्षात विकास दर 6.5% राहिला. भारताची अर्थव्यवस्था जागतिक मंदीच्या काळातही वेगाने वाढत आहे.

आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) विकास दर 2024-25 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) वाढून 7.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत हा दर 6.2 टक्के होता. कृषी, बांधकाम आणि सेवा क्षेत्रातील मजबूत कामगिरीमुळे ही वाढ दिसून आल्याची माहिती शुक्रवारी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीमुळे कळाली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाचा विचार केल्यास या वर्षामध्ये आर्थिक विकास दर 6.5 इतका नोंदवण्यात आला.  गेल्या 4 वर्षांचा विचार केल्यास हा नीचांकी दर आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात म्हणजे 2023-24 च्या जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी दर 8.4 टक्के होता. 

सांख्यिकी मंत्रालयाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, कृषी क्षेत्राचा विकास दर 2024-25 या आर्थिक वर्षात 4.6 टक्के राहिला, हा दर 2023-24 मध्ये 2.7 टक्के होता. 2024-25 च्या चौथ्या तिमाहीत कृषी क्षेत्राचा विकास दर गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीतील 0.8 टक्क्यांच्या तुलनेत 5 टक्क्यांपर्यंत वाढला. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये बांधकाम क्षेत्राचा विकास दर 9.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे. सार्वजनिक प्रशासन, संरक्षण आणि इतर सेवा क्षेत्राचा विकास दर 8.9 टक्के आणि वित्तीय, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवा क्षेत्राचा विकास दर 7.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

नक्की वाचा :अदाणी पोर्ट्सने 15 वर्षांच्या NCDs मधून 5000 कोटी उभारले

2024-25 आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत बांधकाम क्षेत्र 10.8 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.  सार्वजनिक प्रशासन, संरक्षण आणि इतर सेवा क्षेत्राचा विकास दर 8.7 टक्के आणि वित्तीय, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवा क्षेत्राचा विकास दर 7.8 टक्के राहण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ग्राहकांनी आपल्या गरजा भागवण्यासाठी केलेल्या  खर्चात (Private Final Consumption Expenditure) 7.2 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. मागील वर्षी हा आकडा 5.6 टक्के होता. ही गोष्ट अर्थव्यवस्थेसाठी चांगली मानली जात आहे.  

नक्की वाचा :  NMIA खुले होताच पहिल्या दिवसापासून इंडिगोची विमाने झेपावणार

कृषी क्षेत्राच्या दमदार कामगिरीव्यतिरिक्त, महामार्ग, रेल्वे, बंदरे आणि विमानतळ यांसारख्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सरकारने केलेल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे विकास दराला चालना मिळाली आहे. याच कारणामुळे जागतिक मंदीच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे.

Advertisement

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अंदाजानुसार, 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 6 टक्क्यांहून अधिक वेगाने विकास करणारी एकमेव अर्थव्यवस्था असेल. तसेच, अमेरिकेच्या व्यापार शुल्कामुळे (टॅरिफ) जगातील अर्थव्यवस्थांमध्ये चढ-उतार होत असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.