Sheikh Hasina : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू, केंद्रीय संरक्षण मंत्र्यांसह अजित डोवालही बैठकीला उपस्थित

या बैठकीपूर्वी परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती दिली.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

बांगलादेशात उसळलेल्या अभूतपूर्व हिंसाचारानंतर तिथल्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडण्याचा निर्णय घेतला. सोमवारी बांगलादेश सोडल्यानंतर त्या विशेष विमानाने भारतातील हवाई दलाच्या हिंडन तळावर पोहोचल्या. दिल्लीपासून 30 किलोमीटर दूर उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये हा हवाईतळ आहे.

बांगलादेशमधील परिस्थितीमुळे शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना असलेले आरक्षण 30 टक्क्यांवरून 5 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावर बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले होते. यानंतर या आरक्षणासाठी बांगलादेशात हिंसाचार सुरू झाला ज्यात 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यात 13 पोलीस कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झालाय. 

Advertisement

हे ही वाचा : शेख हसीना यांच्या आयुष्यातील सर्वात खडतर 45 मिनिटं, वाचा सत्ता सोडण्यापूर्वी नेमकं काय झालं?

भारतात आल्यानंतर शेख हसीना यांनी तातडीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. शेख हसीना या भारतातून लंडनला जाणार असून त्या तिथेच आसरा घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडी सुरू असताना सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. बांगलादेशमधील अस्थिर परिस्थिती, शेख हसीना यांनी भारतात येणे, बांगलादेशातील परिस्थितीचा भारतावर होणारा परिणाम या संदर्भात या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित होते. 

Advertisement

हे ही वाचा :  बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, देश सोडून भारतामध्ये दाखल

या बैठकीपूर्वी परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती दिली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी एस.जयशंकर यांच्याकडून माहिती जाणून घेतली. संसद परिसरातच या दोघांची भेट झाल्याचे कळते आहे. बांगलादेशमधील हिंसाचार, शेख हसीना यांनी बांगलादेश सोडणे या घडामोडींमुळे भारतीय रेल्वेने बांगलादेशसोबतची रेल्वेसेवा थांबवली आहे. एअर इंडियाने ढाक्याला दररोज जाणारी 2 विमाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिगोने देखील 30 तासांसाठी बांगलादेशला जाणारी सर्व विमाने रद्द केली आहेत. बांगलादेशात लष्कराने सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली आहे.तिथले लष्कप्रमुख वकार उझ झमान यांनी दूरचित्रवाणी संदेशात म्हटले आहे की लष्कर बांगलादेशमध्ये हंगामी सरकार स्थापन करत आहे. सगळ्या आंदोलकांनी हिंसाचाराचा मार्ग सोडावा आणि आंदोलन थांबवावे असे आवाहनही करण्यात आले आहे.   

Advertisement