- मायक्रोसॉफ्टच्या AI Agri Pilot तंत्रज्ञानामुळे फ्लॅटच्या बाल्कनीत बसून स्वयंचलित शेती करणे शक्य झाले आहे
- या यंत्रणेमध्ये पाणी, खत आणि प्रकाश यांचे नियंत्रण पूर्णपणे AI प्रणालीद्वारे स्वयंचलितपणे होते
- महाराष्ट्रात या तंत्रज्ञानाने २२ फूट उंचीचा ऊस पिकवण्यात यश मिळाले असून उत्पादनात ३० टक्के वाढ झाली आहे
Automatic farming: शेती म्हटली की डोळ्यांसमोर कष्ट, खत, पाणी आणि माती येते. मात्र, आता तंत्रज्ञानाने हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. मायक्रोसॉफ्टने (Microsoft) विकसित केलेल्या 'AI Agri Pilot' मुळे आता फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये बसून स्वयंचलित (Automatic) शेती करणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात याच तंत्रज्ञानाचा वापर करून 22 फूट उंचीचा ऊस पिकवण्यात यश आले आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरात राहणाऱ्या आणि शेतीची आवड असूनही जागा नसणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला तुमच्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये शेती करण्यासाठी शेतकरी असण्याची गरज नाही. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे 'AI Agri Pilot' हे यंत्र तुमच्यासाठी हे काम करणार आहे.
एआय ॲग्री पायलटमध्ये तुम्हाला फक्त पिकाचे नाव फीड करायचे आहे. एक पोषक तत्त्वांची कॅप्सूल टाकायची आहे. त्यानंतर पाणी कधी द्यायचे, खत किती हवे आणि प्रकाशाची गरज किती, हे सर्व निर्णय 'AI' स्वतः घेते. कोबी, टोमॅटो, पालक किंवा सॅलडची पाने यांसारखी पिके तुम्ही तुमच्या मोबाईलवर वाढताना पाहू शकता. मायक्रोसॉफ्टचे सीटीओ (CTO) रणवीर चंद्रा यांनी बिहारमधील आपल्या शेतीचा अनुभव गाठीशी बांधून हे सुलभ तंत्रज्ञान विकसित केले आहे.
या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा महाराष्ट्रातील साखर उद्योगाला होण्याची शक्यता आहे. एआयच्या मदतीने पाण्याचा वापर 50 टक्क्यांनी कमी करून उत्पादनात 30 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. शरद पवार यांनीही या तंत्रज्ञानाची पाहणी केली असून, यामुळे साखर कारखान्यांचा हंगाम वाढवण्यास मदत होणार आहे. या उपकरणात तुम्हाला कोणत्या भाजीचे बीज लावायचे आहे, त्याचे नाव टाकावे लागते. त्यानंतर एआय पायलट स्वतः सर्व तांत्रिक बाबी सांभाळते. सध्या अमेरिका आणि दुबईमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. ज्यांना शेतीची अजिबात समज नाही, त्यांच्यासाठी हे वरदान ठरणार आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि किंमत:
- स्वयंचलित यंत्रणा: पाणी, खते आणि प्रकाश यांचे नियंत्रण पूर्णपणे एआयद्वारे.
- किंमत: भारतात याची अंदाजित किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असेल.
- पाणी बचत: पारंपारिक शेतीपेक्षा 50 टक्क्यांहून कमी पाण्याचा वापर.
- महाराष्ट्रातील यश: या तंत्रज्ञानामुळे उसाच्या उत्पादनात 30 टक्क्यांची वाढ शक्य.
प्रशांत मिश्रा आणि रणवीर चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकल्प राबवले जात आहेत. बिहारच्या मातीशी नाळ जोडलेल्या रणवीर चंद्रा यांनी संगणक विज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य करण्याचा हा प्रयत्न केला आहे. सध्या हे तंत्रज्ञान मोठ्या फूड कंपन्यांसाठी उपलब्ध असले, तरी लवकरच ते सर्वसामान्यांसाठी बाजारपेठेत येईल. विशेष म्हणजे, बर्गर बनवणाऱ्या मोठ्या कंपन्या सध्या स्वतःचा ताजा भाजीपाला पिकवण्यासाठी याचा वापर करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world