18 जून झालेली UGC-NETची परीक्षा रद्द, पेपरफुटीचा संशय; CBI करणार चौकशी

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने UGC-NET जून 2024 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 18 जून रोजी झालेली UGC-NET 2024ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाकडून युजीसीला पेपर फुटल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे परीक्षा प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते. दरम्यान लवकरच परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील. तत्पूर्वी केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. 

UGC NETची परीक्षा देशभरातील विद्यापीठांतील पीएचडी प्रवेश, ज्युनियर रीसर्च फेलोशिप (JRF) आणि साहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतली जाते. 18 जून 2024 रोजी 317 शहरांतील 1 हजार 205 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. एकूण 9 लाख 9 हजार 508 विद्यार्थ्यांनी NETची परीक्षा दिली होती.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

CBT पद्धतीने परीक्षा घेण्यात आली नाही, कारण... 

यंदा UGC NETच्या 83 विषयांची परीक्षा एक नव्हे तर दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली. परीक्षेची पहिली शिफ्ट सकाळी 9.30 वाजेपासून ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत तर दुसरी शिफ्ट दुपारी 3 वाजेपर्यंत ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होती.  

Advertisement

यापूर्वी  UGC NETची परीक्षा ऑनलाइन CBT म्हणजे कम्प्युटरच्या माध्यमातून घेतली जात असे. सर्व केंद्रांवर सर्व विषयांची परीक्षा एकाच दिवशी घेता यावी, यासाठी हा बदल करण्यात आला.

Advertisement

(नक्की वाचा: माजी सैनिकांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा कर्तव्य बजावण्याची मिळणार संधी)

NTAने काय म्हटले?

याबाबत NTAने म्हटले की, "परीक्षा प्रक्रियेची उच्च स्तरावरील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने UGC-NET जून 2024 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा परीक्षा घेतली जाईल, ज्याची माहिती लवकरच दिली जाईल. तसेच CBI या प्रकरणाची चौकशी करेल. NEET (UG) परीक्षा-2024 शी संबंधित प्रकरणामध्ये ग्रेस मार्कशी संबंधित समस्या पूर्वीच पूर्णतः हाताळली गेली आहे. पाटणा येथे झालेल्या परीक्षेत काही अनियमिततेचा आरोप झाल्याप्रकरणी बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. हा अहवाल आल्यानंतर सरकार पुढील कारवाई करेल."

तसेच कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेचा या प्रकरणात समावेश आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पुन्हा देण्यात आला आहे.

NEET UG 2024 मध्ये झालेल्या गोंधळाबाबत देशभरातील विविध राज्यांमधील सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केल्या होत्या. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने NTAला दोन आठवड्यांची नोटीसही बजावली आहे. पुढील सुनावणी 8 जुलै रोजी होणार आहे.

Advertisement

(नक्की वाचा: भारतीय वायू सेनेमध्ये नोकरीची मोठी संधी! पगार, परीक्षा व ऑनलाइन अर्जाची वाचा सविस्तर माहिती)