जाहिरात
This Article is From Jun 18, 2024

माजी सैनिकांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा कर्तव्य बजावण्याची मिळणार संधी

माजी सैनिकांना पुन्हा एकदा लष्करात दाखल होऊन कर्तव्य बजावण्याची संधी मिळणार आहे.  

माजी सैनिकांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा कर्तव्य बजावण्याची मिळणार संधी
पुणे:

मराठवाडा पर्यावरण बटालियन अंतर्गत येत असलेल्या 136 इन्फंट्री बटालियन (टीए) (इको) महारमध्ये सशस्त्र दलामध्ये भरती करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये माजी सैनिक, माजी महिला कर्मचारी, राज्य वन विभागाचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची 53 पदे भरावयाची आहेत. त्यामुळे माजी सैनिकांना पुन्हा एकदा लष्करात दाखल होऊन कर्तव्य बजावण्याची संधी मिळणार आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कुठं होणार भरती?

संभाजीनगर मिलिटरी कँट (सर्वत्र स्टेडियम) येथे 23 ते 28 सप्टेंबर या कालावधीत भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात येणार आहे. 136 इन्फंट्री बटालियन (टीए) इको महार या बटालियन मध्ये सोल्जर जीडी (सामान्य कर्तव्य) ही ४२ पदे (महाराष्ट्र राज्य निवासी), लिपिक जीडी (सामान्य कर्तव्य) 6,  हॉऊस किपर, लोहार, मेस किपर, कारागीर (लाकूड - कामगार), स्टेवार्ड (कारभारी) ही प्रत्येकी एक (संपूर्ण भारतातील निवासी) अशी एकूण 53 पदे रॅलीच्या माध्यमातून भरावयाची आहेत. या बटालियनमध्ये भरती झालेल्या उमेदवारांना वृक्षारोपण उपक्रमात मराठवाडा विभागात तसेच पूर्ण देशात कर्तव्य बजावावे लागेल. 

काय आहे पात्रता?

 माजी सैनिक, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग आणि  राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचारी (अकाली सेवानिवृत्तांसह) यांना किमान वयाची अट नाही. मात्र, रॅलीमध्ये भाग घेताना सेवानिवृत्तीपासून 5 वर्षांच्या आत असावे. किमान सेवा 20 वर्षे असावी. माजी सैनिक (इतर पदे) वयाच्या 50 वर्षापर्यंत भरतीस पात्र ठरतील. माजी सैनिक निवृत्तीवेतन धारक असावेत. उमेदवारांची वैद्यकीय श्रेणी 1 मधील असावी. सेवानिवृत्तीच्या वेळी माजी सैनिकांचे चारित्र्य प्रशंसनीय आणि खूप चांगले असावे. पोलीस प्रकरणामध्ये कोणताही गुन्हा दाखल झालेला नसावा. 

( नक्की वाचा : दुष्काळात शेतकऱ्याची डेअरिंग, उन्हाळी टोमॅटो लावले, लाखो कमावले )

भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि उपदान मिळणार नाही. निवडलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागेल. उमेदवाराची शाररिक चाचणी नियमानुसार घेण्यात येईल. भरती मेळाव्यादरम्यान उमेदवारांना झालेल्या कोणत्याही अपघातास, दुखापतीस भरती करणारे प्राधिकारी जबाबदार राहणार नाही. उमेदवारांची निवड ही पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. माजी सैनिकांचे पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ), डिस्चार्ज बुक, अलीकडील पासपोर्ट आकाराचे आठ रंगीत छायाचित्र, शिक्षण प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र व आधार कार्डची इत्यादी कागदपत्र उमेदवारांनी सोबत आणणे आवश्यक राहील.

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी  9168168136 या मोबाईल नंबरवर संपर्क करुन संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन  136 इन्फंट्री बटालियन (टीए) (इको) महारचे लेफ्टनंट कर्नल एम.एस. नेगी यांनी केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: