Crime News: सोशल मीडियावर 'शो-ऑफ' पडला महागात! प्रसिद्ध महिला युट्यूबरच्या घरावर दरोडा; कुटुंबाला खोलीत कोंडलं

Crime News: मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील प्रसिद्ध युट्यूबर रचना गुर्जर हिच्या घरावर अज्ञात चोरांनी दरोडा टाकला आहे. सोशल मीडियावर दागिने आणि आलिशान लाईफस्टाईलचे प्रदर्शन करणे तिला महागात पडले.

जाहिरात
Read Time: 2 mins

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले दागिने, रोकड आणि आलिशान राहणीमानाचे प्रदर्शन करणे मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील एका महिला युट्यूबरला भलतेच महागात पडले आहे. शनिवारच्या पहाटे अज्ञात चोरांच्या एका टोळीने प्रसिद्ध युट्यूबर रचना गुर्जर हिच्या घरावर धाडसी दरोडा टाकला. चोरांनी रचना आणि तिच्या कुटुंबाला एका खोलीत बाहेरून कडी लावून कोंडले आणि घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व इतर मौल्यवान साहित्यासह सुमारे 8 ते 10 लाख रुपयांचा माल लंपास केला.

 फेंसिंग वायर कापून घरात प्रवेश

नरवर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहनी ख्यावदा गावात युट्यूबर रचना गुर्जर आपल्या कुटुंबासह राहते. रचनाच्या सांगण्यानुसार, शनिवारी पहाटे 2 च्या सुमारास सर्व कुटुंबीय गाढ झोपेत असताना चोरांनी घराच्या सभोवतालचे काटेरी तारांचे कुंपण कापून आत प्रवेश केला. चोरट्यांनी सर्वात आधी रचना आणि तिच्या पतीच्या बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद केला, जेणेकरून कोणालाही बाहेर येता येणार नाही.

Advertisement

(नक्की वाचा-  Pune Crime: PSI असल्याचं भासवण्यासाठी वर्दी घातली, पण एक बारीक चूक अन् अधिकाऱ्याच्या हुशारीने महिलेचा पर्दाफाश)

काठीच्या सहाय्याने सीसीटीव्हीचे अँगल बदलले

चोरटे अत्यंत तयारीनिशी आले होते. त्यांनी स्वतःचे चेहरे कपड्याने झाकले होते. ओळख पटू नये म्हणून त्यांनी घरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे अँगल काठीच्या सहाय्याने छताच्या दिशेने वर वळवले. यानंतर चोरांनी घरातील कपाटांचे टाळे तोडून 1 लाख 91 हजार रुपये रोख, सोन्याचे मंगळसूत्र, चार सोन्याच्या अंगठ्या, चांदीची कंबरपट्टा  आणि इतर दागिने लंपास केले. धक्कादायक म्हणजे, चोरांनी जाताना घरात ठेवलेली महागड्या 'एनर्जी ड्रिंक्स'ची एक पूर्ण पेटीही सोबत चोरून नेली.

पहाटे 4 वाजता उघडकीस आला प्रकार

पहाटे 4 वाजताच्या सुमारास रचना हिला पाणी पिण्यासाठी जाग आली असता, तिला बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे आढळले. तिने तात्काळ फोन करून इतर नातेवाईकांना बोलावले. नातेवाईकांनी येऊन दरवाजा उघडल्यानंतर खालील खोल्यांमधील कपाटांचे कुलूप तुटलेले आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

(नक्की वाचा-  Iran-Israel War: जगाची चिंता वाढली, युद्ध पुन्हा भडकणार? इराणचा इस्रायलवर शक्तीशाली हल्ला)

सोशल मीडियाचे व्हिडिओ बनले चोरांसाठी 'रोडमॅप'?

पोलीस सध्या या प्रकरणाचा सोशल मीडियाच्या बाजूने कसून तपास करत आहेत. रचना गुर्जरचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. तिने नुकतेच तिच्या आलिशान घराचे, सोन्या-चांदीचे दागिने आणि टेबलवर ठेवलेल्या रोकडचे व्हिडिओ रील करून पोस्ट केले होते. एका युझरने तिला दोन दिवसांपूर्वीच कमेंट करून "इतके सोने दाखवू नका, घरात चोर शिरतील" अशी चेतावणीही दिली होती.

पोलिसांचा असा संशय आहे की, चोरांनी रचनाचे हे व्हिडिओ पाहूनच घराचा नकाशा आणि मौल्यवान वस्तू कुठे ठेवल्या आहेत, याचा अंदाज लावला असावा.  पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेत आहेत. 
 

Advertisement
Topics mentioned in this article