इराण-इस्रायल युद्ध पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत. इराणच्या लष्कराने रविवारी रात्री इस्रायलच्या दिशेने थेट क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. एप्रिल 2026 च्या सुरुवातीला अमेरिका, इस्रायल आणि इराण दरम्यान झालेल्या युद्धबंदीनंतरचा हा पहिलाच थेट हल्ला आहे. या हल्ल्यामुळे या प्रदेशात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर युद्ध सुरू होण्याची भीती निर्माण झाली असून, शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.
इस्रायलकडून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे निकामी
तेहरानमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी या हल्ल्याची अधिकृत पुष्टी केली आहे. इराणकडून हल्ल्यानंतर पश्चिम भागातील हवाई क्षेत्र तात्काळ बंद केले आहे. दुसरीकडे, इस्रायलच्या संरक्षण दलाने (IDF) दिलेल्या माहितीनुसार, इराणने किमान तीन वेगवेगळ्या बॅरेजेसमध्ये क्षेपणास्त्रे डागली. सीएनएनच्या (CNN) वृत्तानुसार, इस्रायलच्या 'आयर्न डोम' आणि संरक्षण यंत्रणेने इराणची किमान 10 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली आहेत. या हल्ल्यानंतर इस्रायलमधील लाखो नागरिकांना सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये धाव घ्यावी लागली.
(नक्की वाचा- Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर पोलिसांची मोठी मोहीम, अनेक धक्कादायक बाबी समोर, प्रवाशांना मात्र दिलासा)
इस्रायल लष्करप्रमुखांचा इशारा
या हल्ल्यानंतर इस्रायलमधील राजकीय आणि लष्करी वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. इस्रायली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल या हल्ल्याचा अत्यंत "शक्तीशाली" आणि निर्णायक बदला घेणार आहे. इस्रायलचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल इयाल झमीर यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्पष्ट केले की, "इराणने एक मोठी चूक केली आहे. आदेश मिळताच आमचे लष्कर शत्रूवर पूर्ण ताकदीने आणि कठोरपणे प्रहार करेल."
बेरूतवरील हल्ल्याचा बदला
इराणने हा हल्ला इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतच्या दक्षिण उपनगरांवरकेलेल्या हवाई हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केल्याचे म्हटले आहे. वॉशिंग्टनने नकार देऊनही इस्रायलने रविवारी कोणताही पूर्वइशारा न देता बेरूतवर बॉम्बहल्ला केला होता. इस्रायलच्या मते, इराण समर्थित हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलवर रॉकेट डागल्यामुळे त्यांनी ही कारवाई केली होती.
इराणचा अमेरिका आणि इस्रायलला थेट इशारा
इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स'ने (IRGC) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "जर इस्रायल किंवा अमेरिकेने पुन्हा असे कोणतेही आक्रमक पाऊल उचलले, तर आमचे पुढील प्रत्युत्तर अधिक व्यापक असेल. यामध्ये या प्रदेशातील सर्व अमेरिकन आणि इस्रायली तळांना लक्ष्य केले जाईल." इराणने या इशाऱ्यात लेबनॉनमधील संघर्ष आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जवळील सागरी क्षेत्राचाही उल्लेख केला आहे, ज्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world