Heatwave Death 2026 : २५ मेपासून नवतपाचा कालावधी सुरू झाला आहे. २ जूनपर्यंत हा कालावधी असणार आहे. भीषण उकाड्यामुळे ६ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. तर मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आईने जीव सोडल्याचं समोर आलं आहे.
आईच्या कुशीतच चिमुरड्याचा मृत्यू...
मध्य प्रदेशातून हे वृत्त समोर आलं आहे. येथील हरपालपूर भागातील निवासी रजिया खातूनचा सहा वर्षीय मुलगा हसनैन अहमद याच्यावर शनिवारी तीव्र उन्हाच्या कचाट्यात सापडला होता. यानंतर अचानक, मुलाला पोटात तीव्र वेदना आणि अस्वस्थता जाणवू लागली. यानंतर कुटुंब घाबरलं आणि आईने त्याला उपचारासाठी ताबडतोब डॉक्टरांकडे नेलं. स्थानिक डॉक्टरांनी उपचार केल्यानंतरही मुलाची प्रकृती सुधारली नाही, यानंतर रजिया खातून आपल्या मुलाला घेऊन नौगाव रुग्णालयात पोहोचली. येथे डॉक्टरांनी मुलाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं. मुलाला रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना कडक उकाडा आणि उष्णतेच्या लाटेमुळे मुलाची प्रकृती अधिक बिघडली. आईच्या कुशीत तडफडत हसनैनने शेवटचा श्वास घेतला.
मुलाच्या निधनाच्या दु:खात आईनेही सोडला जीव...
आपल्या ६ वर्षांच्या मुलाला गमावल्याचं दु:ख रजिया सहन करू शकली नाही. लेकाला रुग्णालयात घेऊन जाताना रजियानेही जीव सोडला. रुग्णालयात पोहोचताच दोघांनाही मृत घोषित करण्यात आलं.