Bullet Train: बुलेट ट्रेनचा मुहूर्त ठरला; मुंबई-अहमदाबाद अंतर अवघ्या सव्वा तासात

Bullet Train : मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले की, "बुलेट ट्रेन जर केवळ 4 स्थानकांवर थांबली तर अहमदाबाद आणि मुंबई दरम्यानचे अंतर केवळ 1 तास 58 मिनिटांत पूर्ण करेल.  मात्र सर्व थांब्यांवर बुलेट ट्रेन थांबली तरीही संपूर्ण अंतर केवळ 2 तास 17 मिनिटांमध्ये पूर्ण होईल."

जाहिरात
Read Time: 2 mins

भारतातील महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी घोषणा केली की, भारतातील पहिली हाय-स्पीड बुलेट ट्रेन ऑगस्ट 2027 मध्ये धावेल. पहिली बुलेट ट्रेन गुजरातमधील सुरत ते वापी दरम्यान 100 किलोमीटर अंतर कापेल. यापूर्वी, उद्घाटनाची फेरी सुरत ते बिलिमोरा दरम्यान 50 किलोमीटरच्या मार्गावर नियोजित होती.

देशातील हा पहिला 508 किलोमीटर लांबीचा हाय-स्पीड रेल कॉरिडॉर साबरमती (अहमदाबाद) आणि मुंबई दरम्यान उभारला जात आहे. या मार्गावर बुलेट ट्रेन 320 किमी प्रतितास वेगाने धावेल आणि संपूर्ण अंतर 2 तास 17 मिनिटांत पूर्ण करेल.

मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले की, "बुलेट ट्रेन जर केवळ 4 स्थानकांवर थांबली तर अहमदाबाद आणि मुंबई दरम्यानचे अंतर केवळ 1 तास 58 मिनिटांत पूर्ण करेल.  मात्र सर्व थांब्यांवर बुलेट ट्रेन थांबली तरीही संपूर्ण अंतर केवळ 2 तास 17 मिनिटांमध्ये पूर्ण होईल."

(नक्की वाचा-  Solapur-Akkalkot Highway: सोलापूर-अक्कलकोट मार्गावर कशी होतेय फसवणूक? हा Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)

या प्रकल्पाची पायाभरणी 2017 मध्ये झाली होती आणि सुरुवातीला हा संपूर्ण प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, भूसंपादन आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला विलंब झाला. मंत्री वैष्णव यांनी आता संपूर्ण प्रकल्प 2029 च्या अखेरीस कार्यान्वित होईल, अशी नवीन डेडलाईन जाहीर केली आहे.

Advertisement

ट्रेनच्या प्रकारावर अद्याप अस्पष्टता

उद्घाटनाची तारीख आणि मार्ग निश्चित असतानाही, उद्घाटनाच्या वेळी कोणत्या प्रकारची ट्रेन धावणार यावर मात्र अद्याप अस्पष्टता आहे. रेल्वे मंत्रालयाने कॉरिडॉरवर सिग्नलिंग प्रणाली स्थापित करण्यासाठी सीमेन्सच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमला कंत्राट दिले आहे. परंतु उद्योग तज्ज्ञांचे मत आहे की, ही प्रणाली जपानी शिंकानसेन बुलेट ट्रेनला पूर्णपणे सपोर्ट देऊ शकणार नाही.

(नक्की वाचा- Pune News: "साहेब माझी मजबुरी आहे...", पुण्यातील तरुणाचा VIDEO व्हायरल, चूक कुणाची सांगा?)

त्याचबरोबर, मंत्रालयाने भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) या कंपनीला स्वदेशी पद्धतीने 250 किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम असलेली हाय-स्पीड ट्रेन विकसित करण्यास सांगितले आहे. ऑगस्ट 2027 मध्ये जपानी ट्रेन की स्वदेशी विकसित ट्रेन धावणार या प्रश्नावर मंत्री वैष्णव यांनी कोणतंही स्पष्ट उत्तर दिले नाही. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या पहिल्या फेरीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रेनच्या निश्चितीबद्दलचे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही.
 

Advertisement
Topics mentioned in this article