Mumbai-Bengaluru Vande Bharat: भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या प्रवासाला एक नवा आणि अत्यंत आधुनिक चेहरा दिला आहे. मुंबई ते बंगळुरू दरम्यान लवकरच सुरू होणाऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या पहिल्या एसी डब्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेहमीच्या रेल्वे प्रवासातील साध्या बर्थ, अपुरी जागा आणि अस्वच्छ स्वच्छतागृहांची प्रतिमा मोडीत काढत, या नव्या ट्रेनचा फर्स्ट एसी कोच थेट चालतेफिरते लक्झरी हॉटेल असल्यासारखा दिसत आहे. या डब्याचे प्रिमियम डिझाईन आणि आधुनिक केबिन्स पाहून प्रवाशांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये रेल्वेच्या रात्रीच्या प्रवासातील हा मोठा बदल स्पष्टपणे दिसत आहे. वंदे भारत स्लीपरच्या फर्स्ट एसी विभागात प्रवाशांच्या गोपनीयतेची आणि आरामाची विशेष काळजी घेऊन खाजगी केबिन्स तयार करण्यात आल्या आहेत.
उत्कृष्ट लायटिंग, प्रिमियम फिनिशिंग आणि जागेचा अत्यंत कल्पकतेने केलेला वापर यामुळे हा डबा एखाद्या ट्रेनचा न वाटता हॉटेलच्या रूमसारखा भासत आहे. सध्या धावणाऱ्या वंदे भारत गाड्या प्रामुख्याने चेअर-कार असून त्या कमी अंतरासाठी आहेत, मात्र ही स्लीपर आवृत्ती रात्रीच्या प्रवासासाठी खास डिझाईन करण्यात आली आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुणेकरांसाठी रेल्वेचा 1000 दिवसांचा मेगा प्लॅन; आळंदीमध्ये उभारले जाणार हायटेक महा-टर्मिनल, वाचा.. )
किती वेळ वाचणार?
या नव्या वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे दोन मोठ्या शहरांमधील रात्रीचा प्रवास केवळ आरामदायीच होणार नाही, तर प्रवाशांचा मौल्यवान वेळही वाचणार आहे. सध्या मुंबई ते बंगळुरू या प्रवासासाठी तब्बल 20 तास लागतात. मात्र, वंदे भारत स्लीपर सुरू झाल्यानंतर हा प्रवासाचा वेळ अवघ्या 14 ते 15 तासांवर येणार आहे.
रेल्वेने प्रवासाचा वेग राखण्यासाठी या ट्रेनला कमीत कमी थांबे देण्याचे नियोजन केले आहे. ही संपूर्ण ट्रेन 16 डब्यांची आणि पूर्णपणे वातानुकूलित असणार असून, यामध्ये एकाच वेळी 823 प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
लक्झरी हॉटेलसारख्या आधुनिक सुविधा आणि सुरक्षेला प्राधान्य
केवळ आलिशान बसण्याची आणि झोपण्याची व्यवस्थाच नाही, तर या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये अद्ययावत स्वच्छतागृहे, प्रवाशांसाठी माहिती देणारी डिजिटल डिस्प्ले सिस्टीम आणि चोवीस तास सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा बसवण्यात आली आहे.
या नव्या ट्रेनचा पहिला रेक बंगळुरूमधील एसएमव्हीटी रेल्वे स्थानकावर दाखल झाला असून, ही ट्रेन कर्नाटकातील 3 ते 4 प्रमुख शहरांना जोडत महाराष्ट्रात प्रवेश करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
𝐓𝐡𝐢𝐬 𝐢𝐬 𝐧𝐨𝐭 𝐣𝐮𝐬𝐭 𝐚 𝐭𝐫𝐚𝐢𝐧. 𝐈𝐭'𝐬 𝐍𝐞𝐰 𝐈𝐧𝐝𝐢𝐚'𝐬 𝐬𝐭𝐚𝐭𝐞𝐦𝐞𝐧𝐭. 🇮🇳
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 17, 2026
The Vande Bharat Sleeper is setting new benchmarks in comfort, luxury, and passenger experience, transforming the future of rail travel in India. pic.twitter.com/EddNkdQ2l0
लवकरच तिकीट उपलब्ध होणार
मुंबई-बंगळुरू कॉरिडॉर हा व्यवसाय आणि पर्यटनाच्या दृष्टीने देशातील अत्यंत महत्त्वाचा आणि व्यस्त मार्ग मानला जातो. या मार्गाचा अधिकृत रेल्वे मार्ग आणि थांब्यांची यादी भारतीय रेल्वेकडून सध्या तयार केली जात असून ती लवकरच जाहीर होईल. रेल्वेकडून अद्याप अधिकृत वेळापत्रक आणि सुरू होण्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, या ट्रेनची तारीख निश्चित होताच प्रवाशांना आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला तिकीट बुक करता येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world