यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News : पुणे आणि परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्याची रेल्वे वाहतूक क्षमता थेट दुप्पट करण्यासाठी एक भव्य आणि सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात आला असून पुढील 1000 दिवसांत पुण्याचा रेल्वे कायापालट होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या महाकाय योजनेची घोषणा केली असून यामुळे पुण्याहून सुटणाऱ्या गाड्यांची संख्या तर वाढेलच, पण पुणेकरांना थेट बुलेट ट्रेनचा प्रवासही करता येणार आहे. या संपूर्ण योजनेसाठी महाराष्ट्रात रेल्वेच्या विविध प्रकल्पांतर्गत तब्बल 200000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली जात आहे.
काय आहे योजना?
पुणे रेल्वे स्थानकावरील वाढती गर्दी कमी करण्यासाठी आणि स्थानकाची क्षमता वाढवण्यासाठी एक मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड पुनर्रचना प्रकल्पांतर्गत प्लॅटफॉर्मची संख्या सध्याच्या 6 वरून थेट 12 करण्यात येणार आहे. या विस्तारीकरणाच्या कामाला आजपासूनच अतिशय वेगवान सुरुवात झाली आहे.
प्लॅटफॉर्मची संख्या दुप्पट होणार असल्यामुळे पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवणे शक्य होणार आहे. स्थानकाची क्षमता वाढवण्यासाठी सध्या पुणे स्थानकावर होणारे रेल्वे देखभालीचे काम आता घोरपडी, फुरसुंगी आणि आळंदी येथे स्थलांतरित केले जाणार आहे. तसेच घोरपडी येथे रेल्वे डब्यांच्या देखभालीची संपूर्ण स्वतंत्र व्यवस्था केली जात आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द;मात्र प्रवाशांचा वेळ वाचणार! वाचा काय आहे नवा प्लॅन )
आळंदीमध्ये उभे राहणार भव्य महा-टर्मिनल
पुणे स्थानकाचा ताण कमी करण्यासाठी आधी उरुळी येथे रेल्वे टर्मिनल बनवण्याचा विचार होता, परंतु तिथे जमिनीचे दर खूप जास्त असल्याने आता रेल्वेची स्वतःची जमीन उपलब्ध असलेल्या आळंदी येथे एक भव्य महा-टर्मिनल उभारले जात आहे. आळंदी येथील या महा-टर्मिनलमध्ये 9 प्लॅटफॉर्म, 7 दुरुस्ती मार्गिका (पिट लाईन्स) आणि 17 रेल्वे थांबवण्याच्या मार्गिका (स्टेबलिंग लाईन्स) असतील, जिथून दररोज 35 गाड्यांचे संचलन करणे शक्य होणार आहे.
उपनगरीय रेल्वे स्थानकांचे होणार आधुनिकीकरण
पुण्याभोवतीच्या इतर रेल्वे स्थानकांचा विकास करून पुढील 1000 दिवसांत पुण्याची रेल्वे क्षमता दुप्पट केली जाईल आणि 20 अतिरिक्त गाड्या चालवता येतील. यामध्ये हडपसर रेल्वे स्थानकावर 3 प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण करून आता चौथा प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे, ज्यामुळे तिथे एकूण 4 प्लॅटफॉर्म होतील आणि 5 अतिरिक्त गाड्या चालवणे शक्य होईल.
( नक्की वाचा : Devabhau Taxi मुंबईत Ola, Uber ची मनमानी संपणार! महायुती सरकार सुरु करणार 'देवाभाऊ टॅक्सी' वाचा काय आहे योजना )
खडकी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 चे आधुनिकीकरण करण्यात आले असून तिथे आणखी एक अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारला जात आहे. शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर एक अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि एक अतिरिक्त रेल्वे थांबवण्याची मार्गिका (स्टेबलिंग लाईन) तयार करण्यात आली आहे. खडकी, पुणे, घोरपडी, हडपसर, शिवाजीनगर, फुरसुंगी आणि आळंदी या सर्व स्थानकांचा एकत्रित विकास केला जाणार आहे.
कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याशी कनेक्टिव्हिटी वाढणार
या पायाभूत सुविधांच्या विकासानंतर पुणे शहराला कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र यांसारख्या महाराष्ट्रातील सर्व प्रमुख क्षेत्रांशी जोडणाऱ्या नवीन रेल्वे गाड्या सुरू केल्या जातील. यामुळे राज्यातील वेगवेगळ्या भागात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल.
पुणे ते मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटांत
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू असून, त्याचा पहिला टप्पा पुढील वर्षी सुरू होणार आहे. यासोबतच, नवीन 7 बुलेट ट्रेन मार्गिकांच्या मंजुरीमध्ये मुंबई-पुणे दरम्यान 170 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या 48 मिनिटांत पूर्ण होईल आणि दोन्ही शहरे आर्थिकदृष्ट्या जोडली जातील. याशिवाय, पुणे ते हैदराबाद दरम्यानच्या 500 किलोमीटर अंतरासाठीही बुलेट ट्रेन मार्गिका प्रस्तावित असून, यामुळे हा प्रवास केवळ 2 तास 8 मिनिटांचा होणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या सोबतीने मालवाहतूक मार्गिका
राज्यातील उद्योग आणि शेतीला गती देण्यासाठी जेएनपीटी आणि वाढवण या मोठ्या बंदरांना विदर्भ आणि मराठवाड्याशी जोडले जाणार आहे. यासाठी समृद्धी महामार्गाच्या सोबतीने एक समर्पित मालवाहतूक मार्गिका (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअर) बनवण्याचा प्रस्ताव आहे. या मार्गिकेमुळे राज्यातील 75 टक्के भागाला थेट बंदराची जोडणी मिळेल आणि मालवाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world