विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून टँकर असोसिएशन संपावर आहेत. काल 12 एप्रिल रोजी यासंदर्भात बैठक झाली. मात्र या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे आजही टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या भागात नागरिकांची गैरसोय होत आहे. टँकर असोसिएशनच्या संपामुळे कार्यालयं, मॉल, सोसायटी यांना त्रास सहन करावा लागत आहे.
विशाल गवळी याचा मृतदेह कल्याण मध्ये रात्री आणण्याची शक्यता
विशाल गवळी याचा मृतदेह कल्याणमध्ये रात्री आणण्याची शक्यता आहे. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी याने तळोजा तुरुंगात आत्महत्या केली. कल्याण प्रकरणात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा आणि नंतर तिची हत्या करणाऱ्या विशाल गवळीचा एन्काऊंटर करा अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांकडून केली जात असताना विशाल गवळीने तुरुंगात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. आता त्याचा मृतदेह रात्री उशिरा कल्याणला आणला जाण्याची शक्यता आहे.
बेंगलुरूने केली राजस्थानची शिकार, 9 गडी राखून केला पराभव
राजस्थानने दिलेले 174 धावांचे लक्ष बेंगलुरूने सहज पार केले. 9 गडी राखत राजस्थानचा पराभव केला. बेंगलुरूकडून फिल सॉल्टने 65 तर विराट कोहलीने 62 धावांची खेळी केली. तर देवदत्त पाडिक्कल याने 40 धावांची खेळी केली. सॉल्ट वगळता एकाही फलंदाजाला राजस्थानच्या गोलंदाजांना बाद करता आले नाही. राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 75 धावा केल्या होत्या.
मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ने घेतली गंभीर दखल
पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार न मिळाल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या घटनेची गंभीर दखल महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ने घेतली आहे. या प्रकरणात डॉ घैसास यांना सोमवारपर्यंत कौन्सिल पुढे स्पष्टीकरण सादर करण्यास सांगण्यात आल्याचे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ विंकी रुघवानी यांनी सांगितले आहे.
Live Update : पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अर्धा तास पावसाने चांगलंच झोडपून काढलं. सकाळपासून सूर्य अन् ढगांचा लपंडाव सुरू होता. वातावरणात ही उकाडा निर्माण झाला होता. मात्र दुपारच्या सुमारास अचानकपणे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळं शहरवासियांची चांगलीच तारांबळ उडाली.
Live Update : कायद्याने फाशी झाली असती तर बरं झालं असतं, भाजपा आमदार सुलभा गायकवाडांनी व्यक्त केली खंत
कायद्याने फाशी झाली असती तर बरं होतं परंतु त्याने स्वतःला फाशी लावून घेतली न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया भाजपा कल्याण भाजपा कल्याण पूर्वेचे आमदार सुलभा गायकवाड यांनी दिली.
Live Update :मालवण समुद्रातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याचा 358 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
मालवण समुद्रातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याचा 358 वा वर्धापन दिन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती व राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय विभाग यांच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मोरयाचा धोंडा पूजन, सागर पूजन व सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात शिवरायांचे पूजन करण्यात आले. तसेच शिवप्रार्थना म्हणत, मर्दानी खेळ सादर करत आणि शिवरायांचा जयघोष करत शिवरायांना मानवंदना देण्यात आली.
Live Update : राख वाहून नेणाऱ्या 11 वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई
राख वाहून नेणाऱ्या 11 वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई...
* अकरा वाहनांना ठोठावला दोन लाख 25 हजारचा दंड...
* मोटर वाहन कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली...
* अमरावतीच्या नांदगाव पेठ येथील रतन इंडिया प्रकल्पातून होत होती राखीची वाहतूक...
* परिवहन विभागाकडून तपासणी मोहीम राबवून केली कारवाई..
Live Update : धवलसिंह मोहिते पाटलांना धक्का, शंकरराव सहकारी बँकेचा परवाना रद्द
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांना धक्का, अकलूजमधील शंकरराव सहकारी बँकेचा परवाना आरबीआय कडून रद्द प्रशासक नेमण्याचा आदेश
बँकिंग'चा परवाना रद्द करण्यामागील कारण, मोहिते पाटील बँकेकडे सध्या पुरेसे भांडवल आणि उत्पन्नाच्या संधी नाहीत. त्यामुळे, बँकिंग नियमन कायद्यानुसार तरतुदींचे पालन होत नाही. बँकिंग नियमन कायद्याचे पालन करण्यात शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक अपयशी ठरली आहे, त्यामुळे ही बँक चालू राहणं, ठेवीदारांच्या हितासाठी धोकादायक आहे.
सदर बँक धवलसिंह मोहिते पाटील यांच्या अधिपत्याखाली काम करत होती
Live Update : पुणेकरांनो पाणी जपून वापरा, मनपाकडून नागरिकांना विनंती पत्र
पुणेकरांनो पाणी जपून वापरा, मनपाकडून नागरिकांना विनंती पत्र
पाणी बचतीसाठी महापालिकेकडून नागरिकांना पत्र लिहित विनंती केली जाणार
राज्य शासनाकडून जल व्यवस्थापन पंधरवडा साजरा केला जाणार असून त्याअंतर्गत पालिकेकडून पाणी बचतीसाठीची जनजागृती मोहीम राबविण्यात येणार
याच मोहिमेअंतर्गत पुणे महानगरपालिका आता शहरातील नागरिकांना पाणी जपून वापरण्यासाठी विनंती पत्र लिहिणार आहे
शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढल्याने पाण्याची मागणी 10 ते 15 टक्क्यांनी वाढली आहे. अशा स्थितीत, महापालिकेस धरणातून मिळणारे पाणी मर्यादीत असल्याने पाणी बचतीसाठी पालिकेकडून पत्र पाठवून जनजागृती केली जाणार आहे.
Live Update : कल्याणमधील चिमुकलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या विशाल गवळीची तुरुंगात आत्महत्या
कल्याणमधील चिमुकलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या विशाल गवळीची तुरुंगात आत्महत्या
Live Update : ज्या भागात गुंडाची दहशत तिथूनच काढली पुणे पोलिसांनी धिंड
पुण्यातील हडपसर परिसरातील सय्यदनगर भागात कुख्यात गुंड टिपू पठाण याच्या सह त्याच्या साथीदारांची पोलिसांनी धिंड काढली. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात पठाण हा त्याच्या साथीदारासह पैशांची उधळण करत नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका महिलेची जमीन बळकावल्याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत टिपू आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. यानंतर काल पोलिसांनी त्याची त्याची दहशत असलेल्या भागातूनच धिंड काढली
Live Update : येवल्यात अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा, कांदा पिकाला सर्वाधिक फटका
नाशिकच्या येवला व परिसरात काल दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांद्यासह शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतात उभ्या कांद्याच्या पिकाला गारपिटीचा फटका बसला तर शेतात काढून ठेवलेला कांदा ओला झाल्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास अस्मानी संकटामुळे हिरावून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. एकीकडे कांद्याच्या भावात दररोज घसरण होत असून, मिळणाऱ्या सरासरी भावातून उत्पादन खर्चही निघणे कठीण झालेला असताना आता लहरी निसर्गाने तडाखा दिला. तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली
Live Update : मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉग
मध्य रेल्वेवर सकाळी 10.55 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप तसेच डाऊन धीम्या मार्गावर आणि सीएसएमटी स्थानकातून सकाळी 10.48 ते दुपारी 3.32 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन-धीम्या मार्गावरील गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन-जलद मार्गावर वळविल्या जाणार आहेत.
कुर्ला आणि वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर 11.10 ते 4.10 पर्यंत ब्लॉक असणार आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत पनवेल, बेलापूर, वाशी येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.