रुपेश सामंत, प्रतिनिधी
Narendra Dabholkar Murder case : सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या खटल्याचा यशस्वी बचाव करणाऱ्या एका आरोपीचा आणि वकिलांच्या गटाचा सत्कार करण्यात आला आहे. गोव्यात झालेल्या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवात त्यांचा सत्कार झाला.
दक्षिण गोव्यातील फोंडा शहरात 24 जून ते 30 जून दरम्यान हे अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात नरेंद्र दाभोलकर हत्येतील आरोपींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांचा सत्कार करण्यात आला. तसंच या प्रकरणात निर्दोष सुटलेल्या सनातन संस्थेच्या साधकाचाही सत्कार करण्यात आला, अशी माहिती आयोजकांनी मंगळवारी (2 जुलै ) दिली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपा आमदारही उपस्थित
हिंदू जनजागृती समिती या उजव्या विचारसरणीच्या संघटनेनं या अधिवेशनाचं आयोजन केलं होतं. या संघटनेच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी या अधिवेशनाला हजेरी लावली होती. तेलंगणाचे भाजप आमदार टी राजा सिंह लोध यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवलं,' असं HJS प्रवक्त्याने सांगितले.
नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल झालेल्या आणि नंतर न्यायालयाने निर्दोष सुटलेल्या आरोपींपैकी विक्रम भावे यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर इतरांनी ॲड. प्रकाश सालसिंगकर (उच्च न्यायालय, मुंबई, महाराष्ट्र), ॲड. घनश्याम उपाध्याय (अध्यक्ष, लॉयर्स फॉर जस्ट सोसायटी, मुंबई, महाराष्ट्र), ॲड. मृणाल व्यवहारे साखरे (सदस्य, हिंदू लर्निंग कौन्सिल, पुणे, महाराष्ट्र), आणि ॲड. स्मिता देसाई (पुणे, महाराष्ट्र), यांचा सत्कार केला, अशी माहिती या प्रवक्त्यांनी दिली.
( नक्की वाचा : दाभोलकर हत्याकांडाचा निकाल समोर; पाचपैकी 2 दोषी, 3 निर्दोष )
अमेरिका, सिंगापूर, घाना, इंडोनेशिया, नेपाळ तसेच भारतातील 26 राज्यांतील विविध संघटनांचे प्रतिनिधीत्व करणारे 1000 पेक्षा जास्त प्रतिनिधी या 7 दिवसांच्या अधिवेशनाला उपस्थित होते.