NEET Paper Leak 2026 : देशभरातील 22 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लावणाऱ्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीनंतर आता केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीए अत्यंत सावध झाली आहे. गेल्या 3 मे रोजी झालेली परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे रद्द करावी लागली होती, ज्याची चौकशी सध्या सीबीआय करत आहे.
या पार्श्वभूमीवर आता येत्या 21 जून रोजी होणारी नीटची पुनरपरीक्षा पूर्णपणे सुरक्षित आणि लीक-प्रूफ करण्यासाठी प्रशासनाने सुरक्षेची अशी भिंत उभारली आहे, ज्याचा भेद करणे अशक्य मानले जात आहे. या परीक्षेचा पेपर काढणाऱ्या तज्ज्ञ शिक्षकांना बाहेरील जगापासून पूर्णपणे तोडण्यात आले असून सुरक्षेसाठी थेट हवाई दलाची मदत घेतली जात आहे.
कशी घेतली जातीय खबरदारी?
नीट परीक्षेचा पेपर सेट करण्यासाठी एनटीएने एक विशेष पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील नामांकित शिक्षक आणि विषय तज्ज्ञांची एक विशेष टीम सुमारे 20 दिवसांपूर्वीच तयार करण्यात आली होती. या सर्व तज्ज्ञांना एका गुप्त आणि अत्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी कोणालाही मोबाईल फोन किंवा इंटरनेट वापरण्याची अजिबात परवानगी नाही. बाहेरील जगाशी या टीमचा संपर्क पूर्णपणे तोडण्यात आला असून हा विजनवास येत्या 21 जून रोजी परीक्षा संपेपर्यंत असाच कायम राहणार आहे. एनटीएच्या अंतर्गत सुरक्षेचे अनेक स्तर येथे तैनात करण्यात आले आहेत, जेणेकरून पेपरचा एक शब्दही बाहेर जाऊ शकणार नाही.
( नक्की वाचा : Akola News: NEET पेपरफुटीचा आणखी एक बळी! अकोल्यात डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या होतकरू मुलीचा टोकाचा निर्णय )
हवाई दल आणि पॅरामिलिटरी फोर्स सांभाळणार सुरक्षेची धुरा
यंदाचा पेपर कोणत्याही परिस्थितीत लीक होऊ नये यासाठी देशातील सर्वोच्च सुरक्षा यंत्रणांना कामाला लावले गेले आहे. तयार झालेले प्रश्नपत्रिकांचे संच देशातील विविध परीक्षा केंद्रांवर सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत घेतली जात आहे. याशिवाय, परीक्षा केंद्रांवर आणि इतर संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी देशभरात सुमारे 5 लाख सुरक्षा कर्मचाऱ्यांची फौज तैनात केली जाणार आहे.
एवढेच नव्हे तर प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सीसीटीव्ही कॅमेरे वापरले जातील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही 24 तास कडक लक्ष ठेवले जात आहे, जेणेकरून कोणतीही अफवा किंवा गैरप्रकार तातडीने रोखता येईल.
( नक्की वाचा : NEET Paper Leak: 'नीट'मध्ये कोऱ्या उत्तरपत्रिकेचा खेळ? उत्तरं भरण्यासाठी 20 लाखांचा रेट, वाचा कसं चालतं रॅकेट )
सीबीआयच्या तपासात उघड झाल्या त्रुटी
मोठ्या परीक्षांचे पेपर सेट करण्यासाठी आधीपासूनच कडक नियम आहेत. यामध्ये प्रश्नपत्रिकांचे अनेक वेगवेगळे संच तयार केले जातात आणि कोणत्या संचाचा वापर प्रत्यक्ष परीक्षेत केला जाईल, हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाही माहीत नसते. असे असूनही मे महिन्यात झालेल्या परीक्षेत मोठी त्रुटी समोर आली होती.
सीबीआयने या प्रकरणात पी व्ही कुलकर्णी नावाच्या एका तज्ज्ञाला अटक केली आहे, जो अनेक वर्षांपासून एनटीएसोबत काम करत होता. त्यानेच प्रश्नपत्रिकेच्या अनेक आवृत्तींची माहिती मिळवून ती लीक केल्याचा आरोप आहे. या धक्कादायक प्रकरणातून धडा घेत आता शिक्षण मंत्रालय आणि एनटीएने संपूर्ण सुरक्षा व्यवस्था नव्याने आणि अत्यंत कडक केली आहे.