नीट-युजी परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात आज तीन याचिकांवर सुनावणी पार पडली. यावेळी NTA (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) ने नीटमध्ये ग्रेस मार्क दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय दिला आहे. त्यामुळे आता 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागेल. त्यांचा स्कोर कोर्ड रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा 23 जून रोजी परीक्षा द्यावी लागणार आहे. यानंतर 30 जूनला या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाईल.
विद्यार्थ्यांना परीक्षेत दिलेल्या ग्रेस मार्काबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावेळी तीन याचिकाकर्त्यांनी नीट परीक्षेत ग्रेस मार्क देण्यात अनियमितता झाल्याचा आरोप केला होता आणि ही परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. ग्रेस मार्कांबाबत एनटीएने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की, ज्या 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आलेत, त्यांना पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायची नाही, त्यांच्या स्कोअर कार्डमधून ग्रेस मार्क हटविण्यात येतील.
तीन याचिकांपैकी एक याचिका फिजिक्स वालाचे सीईओ अलख पांडेने दाखल केली होती. एनटीएचा ग्रेस मार्क देण्याचा निर्णय मनमानी कारभार असल्याचं फिजिक्स वाल्यांचं म्हणणं आहे. दुसरी याचिका एसआयओचे सदस्य अब्दुल्ला मोहम्मद फैज आणि डॉ. शेख रोशन मोहिद्दीन यांनी दाखल केली होती. या याचिकेत परीक्षांचे निकाल रद्द करणे आणि पुन्हा परीक्षेचं आयोजन करण्याची मागणी करण्यात आली होती.
नक्की वाचा - ससून हॉस्पिटलचा आणखी एक भोंगळ कारभार, रुग्णांवर या गोष्टीसाठी टाकला जातोय दबाव
संशय आणि तक्रार काय ?
नीटच्या परीक्षेत 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे 720 गुण मिळाले. त्यातील 8 विद्यार्थी हरियाणातील एकाच केंद्रावरचे आहेत. गतवर्षी केवळ एकाच विद्यार्थ्याला 720 गुण मिळाले होते. याशिवाय 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आले होते. या ग्रेस मार्कमध्ये संदिग्धता असल्याचा आरोप करण्यात आला होता.