जाहिरात

NEET परीक्षेचा गोंधळ काय आहे? ग्रेस मार्क्स ते पेपर लीक सर्व प्रश्नांची वाचा उत्तरं

NEET UG 2024 : 'नीट' परीक्षेच्या निकालानंतर गोंधळ का उडाला आहे? विद्यार्थ्यांचे आरोप आणि त्यावर NTA चं उत्तर काय आहे ते पाहूया...

NEET परीक्षेचा गोंधळ काय आहे? ग्रेस मार्क्स ते पेपर लीक सर्व प्रश्नांची वाचा उत्तरं
NEET परीक्षेवरील आक्षेप आणि NTA नं दिलेलं उत्तर
मुंबई:

NEET परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यापासून वाद सुरु झाला आहे. यंदा या परीक्षेत 720 पैकी 720 मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही तब्बल 67 आहे. त्यामुळे या निकालावर प्रश्न विचारण्यात येत आहे. यंदाच्या परीक्षेत पेपर लीक झाल्यापासून ते निकालामध्ये गडबड झाल्याचा आरोप करण्यात येतोय. सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी झालेल्या सुनावणीत याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या परीक्षेत वेळेचा अपव्यय झाल्यामुळे देण्यात आलेले ग्रेस मार्क न्यायालयानं रद्द केले आहेत. कोर्टानं हे मार्क्स मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय दिला आहे. त्यांनी ही परीक्षा दिली नाही तर त्यांची रँकिंग ग्रेस मार्क्स रद्द करुन निश्चित होईल.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीपूर्वी NTA नं विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपावर स्पष्टीकरण दिलं आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि त्यावरील NTA ची उत्तरं काय आहे हे पाहूया

प्रश्न : यंदा कोणत्याही विद्यार्थ्याला 718 आणि 719 मार्क्स का नाहीत?

उत्तर : NEET चे निकाल जाहीर झाल्यानंतर यंदा कोणत्याही विद्यार्थ्यांना 718 किंवा 719 मार्क्स मिळाले नाहीत, असा आरोप अनेक विद्यार्थ्यांनी केला होता. त्यावर ग्रेस मार्क्सची तरतूद असल्यानं हे शक्य असल्याचं स्पष्टीकरण NTA कडून देण्यात आलं. यंदा दोन विद्यार्थ्यांना 718 आणि 719 मार्क्स मिळाले आहेत.

प्रश्न : किती विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स मिळाले?

उत्तर : यंदाच्या परीक्षेत 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले आहेत, असं NTA नं स्पष्ट केलं. परीक्षा सुरु होण्यास उशीर झाल्यानं हे मार्क्स देण्यात आले. त्याचबरोबर ज्या 67 विद्यार्थ्यांना 720 मार्क्स मिळाले आहेत त्यापैकी 44 जणांनी फिजिक्सचा पेपर फेरतपासणीसाठी दिला होता. तर 6 जणांना वेळ वाया गेल्यानं अतिरिक्त मार्क्स देण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांचे मार्क्स फेरतपासणीमुळे वाढले, असा खुलासा NTA नं केला आहे. 

( नक्की वाचा : NEET-UG 2024 बाबत मोठा निर्णय, ग्रेस मार्क रद्द; 1563 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा )
 

प्रश्न :  टॉप 100 विद्यार्थी एक शहर किंवा भागातील आहेत?

उत्तर : टॉप 100 विद्यार्थी हे 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 55 शहरं आणि 89 केंद्रामधील आहेत, असं उत्तर NTA नं दिलं आहे.

प्रश्न :  सवाई माधोपूर, राजस्थानच्या सेंटरवर त्या दिवशी काय झालं?

उत्तर : केंद्र पर्यवेक्षकाच्या चुकीमुळे हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. तर काही ठिकाणी याच्या उलट झालं. प्रश्नपत्रिका संध्याकाळी 4.25 वाजता सोशल मीडियावर अपलोड करण्यात आली. त्यामुळे पेपर लीक झाल्याचा अनेकांचा समज झाला, असं NTA नं सांगितलं. 

प्रश्न :  बिहार आणि गोध्रामध्ये पेपर लीक झाला?

उत्तर : काही परीक्षा केंद्रावर कॉपीचे प्रकार झाले असू शकतात, असं NTA नं या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं आहे. पण, पेपर लीक झालाय हा दावा पूर्ण चूक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

प्रश्न :  720 मार्क्स मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या का वाढली?

उत्तर : गेल्या काही वर्षांपेक्षा यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे 720 पैकी 720 मार्क्स मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याचं NTA नं सांगितलं. 

प्रश्न : अनेक ठिकाणी उत्तर पत्रिका सोडवणाऱ्या टोळीनं लाखो रुपयांच्या बदल्यात परीक्षा दिली?

उत्तर : हे प्रकार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक राज्यांच्या पोलिसांनी या प्रकरणात संबंधितांविरुद्ध FIR दाखल केली आहे. 

प्रश्न : निश्चित तारखेपूर्वी निकाल का जाहीर झाला?

 उत्तर :  NEET-UG 2024 सह NTA कडून घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांचे निकाल उत्तरांना आव्हान देण्यासाठी निश्चित कालावधीनंतर जाहीर केले आहेत. अन्य ठिकाणी होणारे कौन्सलिंग आणि प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक लक्षात घेऊन यंदा निकाल लवकर जाहीर करण्यात आला.

प्रश्न :   अनेक व्हायरल व्हिडिओमध्ये मार्क्स देण्यामध्ये भेदभाव झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऑनलाईन निकाल उपलब्ध नाही तसंच फाटक्या OMR उत्तर पत्रिका मेलच्या माध्यमातून पाठवण्यात आल्या आहेत का?

उत्तर :  NTA कडून कोणत्याही विद्यार्थ्याला मेलच्या माध्यमातून फाटकी OMR उत्तरपत्रिका पाठवण्यात आलेली नाही.
- काही विद्यार्थ्यांनी 715 मार्क्स मिळाल्याचा दावा केलाय. हा दावा चूक आहे. त्यांना फक्त 335 मार्क्स मिळाले आहेत. 
- परीक्षेचा निकाल ऑनलाईन उपलब्ध आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com