NEET-UG 2024 Hearing Updates: नीट पेपर लीक प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. सोमवारी (22 मे) रोजी सकाळी 10.30 वाजता पुन्हा या प्रकरणाची सुनावणी पार पडणार आहे. NEET पेपर लीक प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टाने NTA (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) ला महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे निकाल वेबसाइटवर प्रकाशित करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला NEET-UG 2024 साठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेले शहरनिहाय आणि केंद्रनिहाय निकाल त्यांच्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देश दिले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने कथित पेपर लीक आणि गैरप्रकारांमुळे NEET-UG 2024 परीक्षा रद्द करण्याच्या याचिकांवर सुनावणी करताना हा आदेश दिला. एनटीएने सर्व उमेदवारांचे निकाल प्रसिद्ध न केल्याने केंद्रनिहाय मार्किंग पॅटर्न शोधू शकले नाहीत, अशी तक्रार याचिकाकर्त्यांनी केली होती.
याचिकाकर्त्यांनी काय म्हटलं?
याचिकाकर्त्यांनी म्हटलं की, NEET-UG 24 परीक्षेचा निकाल वेबसाइटवर प्रकाशित करणे योग्य होईल. ज्यामुळे उमेदवारांना मिळलेल्या केंद्रनिहाय गुणांवर काही पारदर्शकता येईल. NEET-UG 24 परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण प्रकाशित करा आणि प्रत्येक केंद्र आणि शहराच्या संदर्भात विद्यार्थ्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल याची देखील खबरदारी घ्यावी.
(नक्की वाचा- अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वापूर्ण बैठक)
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याच्या निर्देशाला कडाडून विरोध केला. मात्र, पटना आणि हजारीबागच्या केंद्रांमध्ये पेपर लीक झाल्याचे सरन्यायाधीशांनी तोंडी मान्य केले. पेपर लीक त्या केंद्रांपुरतीच मर्यादित आहे की इतर शहरे आणि केंद्रांमध्ये पसरली आहे, हे तपासण्यासाठी निकालांच्या संपूर्ण डेटाचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे.
खंडपीठाने सुरुवातीला NTA ला शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निकाल प्रकाशित करण्याचे निर्देश दिले असले तरी प्राधिकरणाचे वरिष्ठ वकील नरेश कौशिक यांनी 23 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल असल्याने अधिक वेळ देण्याची विनंती केली. त्यानुसार खंडपीठाने शनिवारपर्यंत मुदत वाढवली.
काय आहे प्रकरण?
NEET-UG 2024 ची परीक्षा 5 मे रोजी पार पडली. परीक्षेत अनियमितता आणि पेपरफुटीचा आरोप झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी निदर्शने सुरु केली. NEET-UG परीक्षेत जास्त गुण दिल्याचे NTA वर आरोप झाले आहेत. त्यामुळे यंदा विक्रमी 67 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. गेल्या वर्षी अवघे दोन विद्यार्थी अव्वल आले होते. अनेक विद्यार्थ्यांचे गुण जाणूनबुजून वाढवले किंवा कमी करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. दुसरीकडे 6 केंद्रांवर परीक्षा घेण्यास उशीर झाला होता. वेळेचा अपव्यय भरून काढण्यासाठी, अशा केंद्रांमधील किमान 1500 विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणही देण्यात आले, ज्यांची चौकशी सुरू आहे.
( नक्की वाचा : पूजा खेडकरांच्या वडिलांनी 2 कोटींची लाच दिली ते मंत्री कोण? तक्रारदारांनी सांगितलं नाव )
ग्रेस मार्क्स कुटे दिले गेले?
मेघालय, हरियाणा, छत्तीसगड, सुरत आणि चंदीगडमधील किमान 6 परीक्षा केंद्रांवर परीक्षेला उशीर झाला. परीक्षेला कमी वेळ मिळाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. त्यानंतर न्यायालयाने तयार केलेल्या सूत्राच्या आधारे या केंद्रांमधील विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले.