आठवडाभरापूर्वीच झाले होते लग्न, हातावरची मेंदीही तशीच...राजकोट अग्नितांडवात पती-पत्नीचा मृत्यू

Rajkot Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीमध्ये नवविवाहित दाम्पत्याचाही होरपळून मृत्यू झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Rajkot Game Zone Fire: गुजरातच्या राजकोट शहरामध्ये गेमिंग झोनमध्ये घडलेल्या दुर्घटनेने काही लोकांना आयुष्यभरासाठी कधीही न भरणाऱ्या जखमा दिल्या आहेत. लोक येथे आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी आले होते, पण त्यांच्या पदरी दुःख पडले. टीआरपी गेमिंग झोनमध्ये झालेल्या अग्नितांडवामध्ये 32 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्येच एका नवविवाहित जोडप्याचाही समावेश आहे. अक्षय ढोलरिया आणि ख्याती असे मृत पावलेल्या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. अक्षय आणि ख्याती यांचे लग्न अवघ्या आठवड्यापूर्वीच झाले होते.

24 वर्षीय अक्षय कॅनडामध्ये आपल्या आईवडिलांसह राहत होता. काही दिवसांपूर्वीच 20 वर्षीय ख्यातीसह लग्नगाठ बांधण्यासाठी तो राजकोटमध्ये आला होता. मागील आठवड्यातील शनिवारी दोघांनीही कोर्ट मॅरेज केले. वर्षाच्या अखेरिस त्याच्या लग्नाच्या रिसेप्शनचीही तयारी सुरू होती. पण या दोघांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. दुर्घटना इतकी भीषण होती की त्यांची ओळख पटवणेही शक्य नव्हते. अक्षयच्या मृतदेहाची ओळख एका अंगठीच्या मदतीने करण्यात आली. तर ख्याती आणि तिची बहीण हरिताचा मृतदेह डीएनए टेस्टसाठी पाठवण्यात आला आहे.

(नक्की वाचा: राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये 32 जणांचा जीव घेणारी ती ठिणगी, पाहा CCTV VIDEO)

99 रुपयांची स्कीम ठरली जीवघेणी

गेमिंग झोनमध्ये डिस्काउंट स्कीममुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शनिवारी गेमिंग झोनच्या प्रवेश तिकिटाची किंमत केवळ 99 रुपये ठेवण्यात आली होती आणि हीच स्कीम जीवघेणी ठरली. 

(नक्की वाचा: चारित्र्याच्या संशयावरून डॉक्टर पतीने घेतला पत्नीचा जीव, असे फुटले बिंग)

धक्कादायक माहिती उघड

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "अग्निशमन विभागाच्या परवानगीशिवायच हे गेमिंग झोन सुरू होते. मालकांकडे अग्निशमन विभागाकडून एनओसीही प्राप्त झाले नव्हते. तसेच येथून बाहेर पडण्यासाठी केवळ एकच गेट असल्याने अडचणी निर्माण झाल्या".  

Advertisement

(नक्की वाचा: जळगावात वादळीवाऱ्यामुळे कोसळले घर, एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू)

दोन जण पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी टीआरपी गेम झोनचा मालक आणि मॅनेजरला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान "अग्नितांडवाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाला लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे", अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली आहे. 

VIDEO: Rajkot Gaming Zone Accident | अनेकांचा जीव घेणाऱ्या 'त्या' दुर्घटनेचं CCTV फुटेज अखेरीस समोर