Ahmedabad News: वडीलधारी मंडळी घरातील चिमुकल्या मुलांकडे सातत्याने लक्ष देऊन असतात. कारण लहान मुलं कळत-नकळत कधी काय करतील, हे सांगता येत नाही. छोट्यातील छोटी चूक देखील त्यांच्या जीवावर बेतू शकते. अहमदाबादमधील अशीच एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अवघ्या दीड वर्षांच्या मुलाच्या पोटातून प्लास्टिकचे खेळणं बाहेर काढलं. एका अधिकाऱ्याने बुधवारी (4 फेब्रुवारी) या घटनेबाबतची माहिती देताना सांगितले की, मुलाने हे खेळणे गिळले होते, ज्यामुळे त्याच्या आतड्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता होती.
"पोटामध्ये आढळला हल्क"
हॉस्पिटलच्या बाल शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. राकेश जोशी यांनी सांगितले की, जेव्हा पालक दीड वर्षांच्या मुलाला सिव्हिल रुग्णालयात घेऊन आले, तेव्हा तपासणीदरम्यान त्याच्या पोटात लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेले कॉमिक सुपरहिरो 'हल्क'च्या पात्रासारखे एक छोटे खेळणे अडकले असल्याचे आढळले. बाळाच्या पोटातून हे खेळणे बाहेर काढण्यात आले आहे.
वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले, "जर थोडाही उशीर झाला असता, तर ते खेळणे पोटातून पुढे सरकून आतड्यांमध्ये अडकले असते. अशा परिस्थितीत आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याचा आणि त्या फाटण्याचा धोका निर्माण झाला असता."
(नक्की वाचा: Latur News: एकाच खोलीत मायलेकी 2 वर्षे कैदेत! लातूरमधील घटनेने महाराष्ट्र हादरला, अमानवी कृत्य उघड)
"खेळणे जीवावर बेतले असते"
डॉ. जोशी यांनी पुढे सांगितले की, 18 जानेवारी रोजी मुलाला उलट्यांचा त्रास होऊ लागल्याची माहिती त्याची आईने दिली. तसेच घरातील एक खेळणे गायब असल्याचे लक्षात आल्यावर त्यांना संशय आला की मुलाने ते गिळले असावे. खेळणे गिळल्याची शक्यता लक्षात घेऊन कुटुंबीयांनी तत्काळ मुलाला सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात एक्स-रे काढल्यानंतर मुलाच्या पोटात खेळणे अडकले असल्याचे स्पष्ट झाले.
(नक्की वाचा: Viral Video: पुण्यात भररस्त्यात रक्तरंजित राडा! मैत्रिणीला फोन केला म्हणून मित्रावरच केले कोयत्यानं सपासप वार)
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलाच्या पोटात अडकलेले खेळणे काढण्यासाठी 19 जानेवारी रोजी शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि आता त्याची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे.
अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकल्याने खेळताना प्लास्टिकचे खेळणे गिळल्याने त्याच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता. पण पालकांची सतर्कता आणि डॉक्टरांच्या तत्पर उपचारांमुळे मोठा अनर्थ टळला.