
श्रीनगर:
जम्मू-कश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली आहे. लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जम्मू-कश्मीरमध्ये पर्यटकांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले आहे. हे हल्ले आतापर्यंत कधी कधी झाले आहेत यावर आपण एक नजर टाकूयात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जम्मू-कश्मीरमध्ये पर्यटक कधी-कधी झाले दहशतवादाचे लक्ष्य
- 18 मे 2024: राजस्थानमधील जयपूरहून आलेल्या एका जोडप्याला श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार करून लक्ष्य केले होते.
- 9 जून 2024: रियासी जिल्ह्यात तीर्थयात्रेकरूंनी भरलेल्या बसवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या दहशतवादी हल्ल्यात 9 लोकांचा मृत्यू झाला होता. 33 लोक जखमी झाले होते.
- 14 नोव्हेंबर 2005: श्रीनगरच्या लाल चौक परिसरात एका चित्रपटगृहाजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे 2 जवान आणि 2 नागरिक असे एकूण 4 लोक मारले गेले होते. या हल्ल्यात 1 जपानी पर्यटक आणि 16 लोक जखमी झाले होते.
- 4 जुलै 1995: पहलगाममधील लिद्दरवाट येथे हरकत-उल-अंसार या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी 6 विदेशी पर्यटक आणि 2 गाईड यांचे अपहरण केले होते. अपहृत पर्यटक अमेरिका, ब्रिटन, नॉर्वे आणि जर्मनीचे नागरिक होते. दहशतवाद्यांनी एका पर्यटकाची हत्या केली होती.
- 20 जुलै 2001: अमरनाथ यात्रेकरूंच्या एका कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 8 यात्रेकरू आणि 5 इतर लोक त्यात तीन स्थानिक नागरिक आणि सुरक्षा दलाचे दोन जवान असे एकूण 13 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 15 जण जखमी झाले होते.
- 1-2 ऑगस्ट 2000: दहशतवाद्यांनी कश्मीरमधील अनंतनाग आणि जम्मू विभागातील डोडा जिल्ह्यात अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांना लक्ष्य केले. 1 ऑगस्ट रोजी झालेल्या पाच हल्ल्यांमध्ये सुमारे 100 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 2 ऑगस्ट रोजी पहलगाममधील नुनवान बेस कॅम्पवर हल्ला करण्यात आला. यात 21 यात्रेकरू, सात स्थानिक दुकानदार आणि तीन सुरक्षा रक्षक मारले गेले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world