Parents Support Son After Exam Setback: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. पास झालेले विद्यार्थी आनंदात आहेत, तर जे विद्यार्थ्यानी नापास झाले आहेत त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी आहे. मात्र असे काही विद्यार्थी आहेत जे अपयशाने खचतात. अशावेळी पालकांनी आपल्या पाल्याच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. कर्नाटकातील पालकांनी तर आपला मुलगा दहावीत नापास झाला म्हणून त्याचं सेलिब्रेशन केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काही दिवसांपूर्वीच कर्नाटक बोर्डाच्या दहावीचा निकाल जाहीर झाला. इंग्रजी माध्यम शाळेतील अभिषेक चोलाचगुड्डा या विद्यार्थ्याला 625 पैकी फक्त 200 गुण मिळाले आहेत. दहावीच्या बोर्ड परीक्षेत नापास झाल्यामुळे अनेकांनी त्याची खिल्ली उडवली. मात्र अभिषेकचे कुटुंबीय खंबीरपणे त्याच्या पाठिशी उभे राहिले. मुलगा नापास झाला तरी त्यांनी याचं सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं. आपल्या मुलाचे खच्चीकरण होऊ नये यासाठी त्यांनी केक कापला आणि एकत्र आनंद साजरा केला.
यावेळी अभिषेकच्या वडिलांनी म्हटलं की, 'तुम्ही परीक्षेत नापास होऊ शकता, पण आयुष्यात नाही. परीक्षेचा निकाल हा काही शेवट नाही, तर एक नवीन सुरुवात आहे. कुटुंबीयांच्या या कृतीने अभिषेक भावुक झाला. मी पुन्हा परीक्षा देईन आणि पास होऊन आयुष्यात पुढे जाईन, असा निर्धार त्याने केला. अभिषेकच्या पालकांचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.
(नक्की वाचा: Maharashtra Board HSC 12th Result LIVE: यंदाचा बारावीचा निकाल 91.88 टक्के, कोकण विभागाची बाजी)
अभिषेकच्या कुटुंबियांचं सकारात्मक पाऊल अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांना एक नवीन दिशा दाखवेल. परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर, विद्यार्थ्याला कुटुंब, नातेवाईक, समाज आणि शाळेतील अनेकांकडून टोमणे ऐकावे लागतात. यातून मुलांवरील दबाव आणि मानसिक तणाव याचा कुणी विचार करत नाही. ज्यामुळे मुले अनेकदा डिप्रेशनमध्येही जातात.
दहावी किंवा बारावीचे निकाल त्यांच्या भविष्याचा पाया ठरवू शकतात, हे बरोबर आहे. मात्रे ते कधीकधी चूकही ठरू शकते. या परिस्थितीत, पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की कमी गुण मिळालेल्या किंवा अनुत्तीर्ण झालेल्या मुलांवर दबाव आणला नाही पाहिजे.