रामराजे शिंदे, दिल्ली: संसदेच्या अधिवेशनात काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये घमासान पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांनी भाजप खासदाराला धक्काबुकी केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर आता राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता असून पोलिसांकडून चौकशी केली जाऊ शकते. दुसरीकडे काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेत देशभरात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संसदेत धक्काबुक्की झाल्यानंतर कांग्रेस आणि भाजपच्या खासदारांनी एकमेकांविरोधात संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. रात्री दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. धमकी देणे, जाणीवपूर्वक दुखापत पोहोचवणे यांसह इतर कलमे त्यांच्यावर लावण्यात आली आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संसदेत आणि संसद बाहेर गदारोळ घालणाऱ्या खासदार विरोधात लोकसभा अध्यक्ष कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता आहे. अध्यक्षांच्या खुर्ची जवळ गेलेल्या आणि संसदेच्या मकर द्वार गेटजवळ धक्काबुक्की करणा-या खासदारांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून राहुल गांधी यांची चौकशीही होऊ शकते.
पोलिसांकडून लोकसभा सचिवालयामार्फत या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मागवले जातील त्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. त्याचबरोबर कलम 117 व्यतिरिक्त सर्व गुन्हे हे जामीनपात्र असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कलम 117 नुसार जखमीच्या गांभीर्यानुसार सात वर्ष कैद किंवा आजीवन कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
दरम्यान लोकसभा अध्यक्षांनी संसदेत आणि प्रवेशद्वारावर कोणतंही निदर्शने करण्यासाठी मनाई केलीय. शिवाय कोणताही खासदाराला अडवणूक करता येणार नसल्याचा आदेशही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा आंदोलन केलं जाईल की अध्यक्षांनी घालून दिलेले नियम पाळले जाईल हे पहावं लागणार आहे.