देशातील लाखो विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक आणि प्रसिद्ध युट्यूबर खान सर यांच्या 'खान जीएस रिसर्च सेंटर' (Khan GS Research Center) या कोचिंग इन्स्टिट्यूटच्या बाहेर अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. मुसल्लहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या घटनेत सुमारे 5 ते 6 राउंड गोळ्या झाडण्यात आल्याचे समजते. या गोळीबारामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
'2 दिवसांत कोचिंग उडवून देऊ'
या धक्कादायक घटनेबाबत स्वतः खान सर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, नुकताच बिहार पोलिस भरतीचा निकाल लागला असून संस्थेतील मोठ्या संख्येने विद्यार्थी यामध्ये यशस्वी झाले आहेत. याच आनंदात कोचिंगमध्ये हजारो यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी थकलेले असतानाच ही घटना घडली.
गार्डवर जीवघेणा हल्ला
काही अज्ञात गुंड प्रवृत्तीचे लोक कोचिंगच्या बाहेर आले. त्यांनी तिथे उपस्थित लोकांना धमकावण्यास सुरुवात केली. जेव्हा संस्थेच्या सुरक्षारक्षकाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी गार्डवर हल्ला केला. यामध्ये गार्ड गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!)
कोचिंग क्लास उडवण्याची धमकी
हल्लेखोरांनी जाता जाता "दोन दिवसांत हे कोचिंग सेंटर बॉम्बने उडवून देऊ," अशी उघड धमकी दिली आणि दहशत निर्माण करण्यासाठी हवेत 5 ते 6 राउंड गोळीबार करून पळ काढला. खान सरांनी या हल्ल्यामागे स्थानिक कोचिंग माफियांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पोलीस तपास सुरु केला आहे.
"काही लोकांना या गोष्टीची मोठी अडचण आहे की आमची संस्था इतक्या कमी फीमध्ये हजारो गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण का देत आहे? आम्ही कमी खर्चात सर्वोत्तम निकाल देत आहोत, जे इतर व्यावसायिक कोचिंग चालकांना सहन होत नाहीये. जेव्हा आमचे विद्यार्थी मोठ्या संख्येने यशस्वी होतात, तेव्हा हे गुंड आमचे यश दाबण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना घाबरवण्यासाठी असे भ्याड हल्ले करतात", असं खान सर म्हणाले.
खान सरांनी पाटणा प्रशासनाकडे कोचिंग इन्स्टिट्यूट आणि तिथे शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तात्काळ पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
2019 मध्येही झाला होता 'देशी बॉम्ब'ने हल्ला
खान सरांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 10 मे 2019 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुसल्लहपूर हाट येथील सेंटरवर अज्ञात बदमाशांनी सलग दोन देशी बॉम्ब फेकले होते. त्या हल्ल्यात कार्यालयाच्या एका भागाचे आणि विद्यार्थ्यांच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले होते, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. तेव्हाही कोचिंग माफियांनीच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप झाला होता.