PM Modi Speech: 'वैचारिक नक्सलवाद' ते 'Gen-Z साठी AI ट्रेनिंग'; PM मोदींच्या भाषणातील 10 ठळक मुद्दे

स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केले. या ऐतिहासिक भाषणात त्यांनी कोरोना संकट व जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा उल्लेख करत भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेवर जोर दिला.

जाहिरात
Read Time: 3 mins

PM Modi Speech : स्वातंत्र्यदिनानिमित्त ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले. लाल किल्ल्यावर प्रथमच 'वंदे मातरम'चे गायन करण्यात आले, ज्याने सोहळ्यात नवा उत्साह भरला. आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, "भारत आता लहान स्वप्नांच्या आधारे पुढे जाऊ शकत नाही. आपल्याला मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि आपले संकल्प दृढ असावे लागतील." जागतिक संकटांच्या काळात देशात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर निशाणा साधत त्यांनी भारताच्या 12 वर्षांतील प्रगतीचा पाढा वाचला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 10 प्रमुख महत्त्वाचे मुद्दे

'वैचारिक नक्सलवाद' आणि देशविरोधी विचारांवर कडक निशाणा

देशातून हिंसक नक्षलवाद आता अंतिम टप्प्यात पोहोचून संपुष्टात येत असतानाच समाज विघटित करणाऱ्या 'वैचारिक नक्षलवाद्यांना' ओळखून त्यांना बाजूला पाडण्याचे आणि देशांतर्गत व सीमापार आव्हानांचा समर्थपणे सामना करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

Advertisement

1 कोटी तरुणांना AI ट्रेनिंग

तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्णतेला'सप्तधारा'चा तिसरा स्तंभ मानत पंतप्रधानांनी देशातील 1 कोटी तरुणांना 1 वर्षात AI ट्रेनिंग देण्याची घोषणा केली. भारताला जागतिक पातळीवर इनोव्हेशनचे हब बनवण्याचे उद्दिष्ट यामागे आहे.

'सप्तशक्ती' सुधारणांचा संकल्प

विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी पंतप्रधानांनी 7-पॉइंट रिफॉर्म्स अजेंडा म्हणजेच 'सप्तशक्ती' ची घोषणा केली. सुधारणा ही मजबुरी नसून आमची निष्ठा आणि संकल्प आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जगाला भारताच्या सामर्थ्याची ओळख

भारतामध्ये आज राजकीय स्थैर्य, भक्कम संविधान आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. त्यामुळे संपूर्ण जग आता भारताच्या क्षमतेला ओळखत असून भारतीय उत्पादने जगभरातील बाजारपेठांमध्ये पोहोचत आहेत.

1.75 कोटी घरांमध्ये पाईपद्वारे गॅस

ऊर्जा सुरक्षेवर बोलताना त्यांनी सांगितले की, 2024 पूर्वी देशातील केवळ 70 शहरांमध्ये पाईप गॅस होता, तो आता 700 शहरांपर्यंत पोहोचला आहे. पूर्वी अवघ्या 20-22 लाख घरांत पोहोचणारा गॅस आज 1.75 कोटी घरांपर्यंत पोहोचला आहे.

Advertisement

पूर्णतः 'आत्मनिर्भर भारत'चा नारा

रशिया-युक्रेन युद्ध व जागतिक संकटाच्या काळात भारताला घाबरवण्याचे प्रयत्न झाले, परंतु देशाने इंधन व खतांचा पुरवठा खंडित होऊ दिला नाही. आता दुसऱ्या देशांवर अवलंबून न राहता स्वतःची क्षमता वाढवून आत्मनिर्भर बनणे हेच देशाचे मुख्य ध्येय आहे.

2047 पर्यंत 'विकसित भारत'चा विडा

स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षी म्हणजेच 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचेच आहे. 140 कोटी भारतीयांच्या पुरुषार्थाने हे अशक्यप्राय ध्येय साध्य केले जाईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

Advertisement

हरित ऊर्जा अन् सौर ऊर्जेतून नागरिकांची कमाई

2014 मधील सौर ऊर्जेची क्षमता आज 160 गिगावॉटवर पोहोचली आहे. 'पीएम सूर्यघर मोफत वीज योजने' मुळे 50 लाख घरांना सौर ऊर्जा मिळाली असून हजारो कुटुंबांचे वीज बिल शून्यावर आले आहे आणि लोक वीज विकून कमाई करत आहेत.

रेल्वेचे 70% पेक्षा जास्त विद्युतीकरण

भारतीय रेल्वेने अत्यंत जलद गतीने प्रगती केली असून 70 टक्क्यांहून अधिक मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे. देशात पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू झाली असून यामुळे पर्यावरणाला मोठा फायदा होत आहे.

एमएसएमई (MSME) आणि जागतिक बाजारपेठ

भारताने जगभरातील 40 पेक्षा जास्त देशांसोबत केलेल्या व्यापारी करारांचा सर्वाधिक फायदा भारतीय शेतकरी आणि लहान उद्योजकांना (MSMEs) होणार आहे. भारतीय उत्पादनांची गुणवत्ता हीच भारताची खरी ओळख असावी, असा सल्ला त्यांनी दिला.
 


Topics mentioned in this article