आता काश्मीरबाबत नाही तर पाकव्याप्त काश्मीरबद्दल चर्चा करू! PM मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

PM Narendra Modi First Speech After Operation Sindoor: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (12 मे) देशाला संबोधित केले. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे दहा मुद्दे जाणून घ्या एका क्लिकवर...

जाहिरात
Read Time: 3 mins
PM Narendra Modi First Speech After Operation Sindoor: PM मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

PM Narendra Modi First Speech After Operation Sindoor: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (12 मे) देशाला संबोधित केले. 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान भारताने जे उग्र रूप धारण केले होते ते पाहून पाकिस्तानही टरकला. अखेर पाकिस्तानच्या डीजीएमओंनी भारताच्या डीजीएमओंना फोन करून शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचे सांगितले. शनिवारी (10 मे) दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली होती. Operation Sindoor यशस्वीरित्या राबवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी सैन्य दलाचे तोंडभरून कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं की, "भारत कोणताही आण्विक ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही आणि पाकिस्तानविरोधातील कारवाई केवळ स्थगित करण्यात आली आहे. भविष्य शेजारील देशाच्या वर्तनावर अवलंबून असेल". पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  1. सुट्टी साजरी करण्यासाठी आलेल्या निष्पाप नागरिकांना त्यांचा धर्म विचारत गोळ्या घालण्यात आला. दहशतवादाचा भयानक चेहरा संपूर्ण जगाने पाहिला. या घटनेनंतर देशवासीयांप्रमाणे माझ्या मनालाही अत्यंत वेदना झाल्या होत्या. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश एकवटला होता. दहशतवाद्यांना आता हे कळून चुकले आहे की माता भगिनींच्या कपाळावरील कुंकू पुसण्याचा परिणाम काय असतो.
  2. बहावलपूर आणि मुरिदकेतील दहशतवाद्यांचे अड्डे हे जागतिक दहशतवादाचे केंद्र बनले आहे. जगातील कोणत्याही दहशतवादी घटनेचे धागेदोरे याच ठिकाणांपर्यंत येऊन पोहोचतात. आमच्या बहिणींच्या कपाळावरील कुंकू पुसले म्हणून भारताने दहशतावद्यांचे अड्डे उद्ध्व्स्त केले. 100 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दहशतवाद्यांचे अनेक म्होरके पाकिस्तानात मोकळेपणाने फिरत होते. त्या म्होरक्यांना भारताने एका झटक्यात संपवले. 
  3. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान नैराश्याच्या गर्तेत गेला होता, उद्विग्न झाला त्यातूनच त्यांनी दुसरे पाऊल उचलले , भारतावर हल्ला सुरू केला. पाकिस्तानने शाळा, कॉलेज, गुरुद्वारा, मंदिरे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या घरांना लक्ष्य केले. पाकिस्तानने आमच्या सैनिकी ठिकाणांना लक्ष्य केले, मात्र यातही पाकिस्तानचा बुरखा फाटत गेला.
  4. पाकिस्तानी ड्रोन, मिसाईल भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणेने त्यांना आकाशातच उडवले. पाकिस्तानला वाटत होतं की सीमेवर हल्ला होईल, मात्र भारताने पाकिस्तानच्या छाताडावरच आघात केला. भारताच्या ड्रोन आणि मिसाइल्सने अचूकपणे हल्ला केला. ज्या हवाई दलाच्या तळांचा पाकिस्तानला गर्व वाटत होता ते तळच भारताने उद्ध्वस्त केले. 
  5. भारताच्या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्तानने विविध देशांकडे याचना करण्यास सुरुवात केली. 10 मेच्या दुपारी पाकिस्तानने मजबुरीने भारताच्या डीजीएमओंना फोन केला, मात्र तोपर्यंत दहशतवाद्याचे अड्डे मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त केले होते, दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले होते. 
  6. पाकिस्तानकडून याचना केली गेली की यापुढे दहशतवादी कारवाई अथवा सैनिकी कारवाई केली जाणार नाही. पाकिस्तानने केलेल्या याचनेनंतर भारताने त्यावर विचार केला. मी स्पष्टपणे सांगतो आहे की आम्ही पाकिस्तानच्या दहशतवादी आणि सैनिकी ठिकाणांवर उत्तरादाखल केलेली कारवाई स्थगित केली आहे. आमचे पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष असेल. भारतावर यापुढे दहशतवादी हल्ला झाला तर जशास तसे उत्तर दिले जाईल. आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. जेथे दहशतवादाची पाळेमुळे जिथे असतील तिथपर्यंत पोहोचून कठोर कारवाई करू. 
  7. आण्विक अस्त्राच्या आधारे ब्लॅकमेलिंग भारत यापुढे सहन करून घेणार नाही. आण्विक अस्त्राच्या आडून दहशतवादी कारवाया करणाऱ्यांच्या अड्ड्यांवर भारत कठोर कारवाई करेल. भारत दहशतवादाला पोसणारे सरकार आणि दहशतवाद्यांच्या आकांना वेगवेगळे म्हणून पाहणार नाही. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचा घाणेरडा चेहरा जगाला दिसला. ठार मारलेल्या दहशतवाद्याच्या अंत्यविधीला पाकिस्तानी सैन्याचे मोठे अधिकारी आले होते. सरकारपुरस्कृत दहशतवादाचा हा मोठा पुरावा आहे. 
  8. भारताच्या नागरिकांना संकटापासून वाचवण्यासाठी सातत्याने निर्णायक पावले उचलत राहू. युद्धाच्या मैदानात पाकिस्तानला धूळ चारली आहे. ऑपरेशन सिंदूरने यात नवा पैलू जोडला आहे. वाळवंट आणि बर्फाळ प्रदेशात आपले श्रेष्ठत्व सिद्ध केलेच शिवाय नव्या युगातील युद्ध प्रकारातील आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. या ऑपरेशनमध्ये मेड इन इंडिया शस्त्रांची उपयुक्तता सिद्ध झाली. आज जग बघतंय की 21 व्या शतकातील युद्धात मेड इन इंडिया शस्त्रांची वेळ आली आहे. 
  9. पाकिस्तानी सैन्य, सरकार ज्या रितीने दहशतवादाला पोसत आहे, ते पाहाता दहशतवादच पाकिस्तानला गिळून टाकेल. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही. 
  10. दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाही तसेच पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. यापुढे पाकिस्तानशी बोलणे होईल तर ते दहशतवादासंदर्भात आणि पाकव्याप्त काश्मीर संदर्भातच होईल.