Amrit Stations : देशातील 103 रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकास करण्यात आला आहे. या स्थानकांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी गुरुवारी (22 मे) रोजी करणार आहेत. अमृत भारत योजनेमुळे या रेल्वे स्थानकांवर आता प्रवाशांना विमानतळाप्रमाणे जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतील.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एनडीटीव्हीशी विशेष बोलताना, रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक, माहिती आणि प्रसिद्धी, दिलीप कुमार यांनी सांगितले की, भारतीय रेल्वे स्थानके उच्चस्तरीय आणि आधुनिक सुविधांनी युक्त बनवण्यासाठी आम्ही अमृत भारत स्टेशन योजना तयार केली आहे. आम्ही या स्थानकांचा विकास सिटी सेंटर' म्हणून करत आहोत.
( नक्की वाचा : Amrit Stations : राज्याला मिळणार 15 अमृत स्टेशन, PM मोदी करणार उद्घाटन )
विमानतळासारख्या सुविधा
दिलीप कुमार यांनी यावेळी सांगितलं की, अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या स्थानकांवर विमानतळाप्रमाणे सुविधा मिळतील. नव्याने बांधलेल्या स्थानकांवर संचार (Circulating) आणि पार्किंगची जागा मोठी आणि आधुनिक पद्धतीने तयार केली आहे. इमारतीमध्ये एस्केलेटर, दिव्यांग अनुकूल स्वच्छतागृहे, मोफत वायफाय आणि सुधारित प्रवासी माहिती प्रणाली देखील बसवली आहे. याव्यतिरिक्त, स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग (Entry and Exit points) वेगवेगळे बनवले आहेत, तर फुट ओव्हर ब्रिज (FOB) आणि लाऊंजही मोठे आणि रुंद केले आहेत.
ते म्हणाले की, आमचा प्रयत्न आहे की ही स्थानके नवीन भारताला अनुरूप असावीत. त्यामुळे, जेव्हा प्रवासी या स्थानकांवर येतील, तेव्हा त्यांना 2047 च्या विकसित भारताचे आपले स्वप्न साकार होत असल्याचे जाणवेल.
भारतीय संस्कृतीची छाप
स्थानकांचे मुख्य डिझाइन स्थानिक संस्कृतीला अनुकूल बनवले आहे. दक्षिण भारतातील स्थानकांमध्ये द्रविड शैलीतील गोपुरम स्थापित केले जात आहेत. जी स्थानके राजस्थान किंवा सीमावर्ती भागांमध्ये बनत आहेत, तिथे पारंपारिक किल्ला आणि दुर्ग निर्मितीच्या शैलीनुसार स्थानकांचा विकास केला आहे. सरकारने स्थानकांचा विकास धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या आधारावर केला आहे.
राज्यातील कोणत्या रेल्वे स्टेशनचा समावेश?
महाराष्ट्रातील 15 रेल्वे स्टेशनचा या योजनेत समावेश आहे. त्यामध्ये परळ, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा, शहाड, लोणंद, केडगाव, लासलगाव, मूर्तिजापूर जंक्शन, देवळाली, धुळे, सावदा, चंदा फोर्ट, एनएससीबी इटवारी जंक्शन, आमगाव या स्थानकांचा समावेश आहे.