Z Morh Tunnel: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू काश्मीरमधील झेड मोऱ्ह बोगद्याचे 13 जानेवारी 2025 रोजी लोकार्पण करण्यात आले. धोरणात्मकदृष्ट्या हा बोगदा देशासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हा बोगदा प्रवासासाठी खुला केल्यानंतर आता भारतीय सैन्य कोणत्याही अडथळ्यांविना सीमावर्ती भागापर्यंत पोहोचू शकतील. यापूर्वी हिवाळ्यामध्ये प्रचंड बर्फवृष्टीमुळे सैन्य आणि सर्वसामान्यांच्या वाहनांना या भागातून ये-जा करणे शक्य होत नव्हते. पण आता या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याने जोरदार बर्फवृष्टीनंतरही येथे प्रवास करणे सोपे होणार आहे. दरम्यान जम्मू काश्मीरमधील या बोगद्यामुळे पाकिस्तान आणि चीनची झोप उडालीय. बर्फवृष्टीचा फायदा घेत घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना आळा बसवण्यासाठी हा बोगदा महत्त्वाचे काम करेल. कारण भारतीय सैन्य आता सहजरित्या सीमावर्ती भागापर्यंत पोहोचू शकतील. श्रीनगर-सोनमर्ग मार्गावर असलेल्या झेड-मोऱ्ह बोगद्यामुळे काश्मीर खोऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास अधिक सोपा होईल. झेड मोऱ्ह बोगद्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
12 किलोमीटरचे अंतर केवळ 15 मिनिटांत पार करणं शक्य
बोगद्याचा आकार इंग्रजीतील झेड अक्षराप्रमाणे असल्याने त्यास 'झेड मोऱ्ह' असे म्हणण्यात येत आहे. या बोगद्याच्या बांधकामामुळे 12 किलोमीटरवरील अंतर आता 6.5 किलोमीटरवर आले आहे आणि हे अंतर पार करण्यासाठी केवळ 15 मिनिटांचा कालावधी लागेल. बोगद्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हिमस्खलनामुळे प्रवासात अडथळे निर्माण होणार नाहीत. हा बोगदा तयार करण्याचे काम वर्ष 2015 मध्ये सुरू करण्यात आले होते.
झेड मोऱ्ह बोगद्याचे वैशिष्ट्य जाणून घेऊया
- वाहनांना ताशी 80 किलोमीटर वेगाने प्रवास करण्याची परवानगी.
- एका तासामध्ये एक हजार वाहने बोगद्यातून प्रवास करू शकतात.
- बोगदा 10 मीटर रुंद आहे आणि त्यासोबत बचावासाठीचा मार्ग म्हणून साडेसात मीटरचा आणखी एक बोगदा तयार करण्यात आलाय.
- 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यासाठी एकूण 2400 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
- श्रीनगरहून सोनमर्ग आणि यानंतर लडाखपर्यंत कोणत्याही अडथळ्याविना प्रवास करणे शक्य.
- झेड मोऱ्ह बोगदा समुद्रसपाटीपासून 8,500 फुटांपेक्षा अधिक उंचीवर आहे.
- बोगदा बांधण्यापूर्वी मार्गावरील हा भाग विशेषतः हिवाळ्यामध्ये अतिशय संवेदनशील होता. पण आता काही येथील आव्हाने मोठ्या प्रमाणात कमी होतील.
बर्फवृष्टीमुळे आता वाहतुकीमध्ये अडथळे येणार नाहीत
- झेड मोऱ्ह बोगदा श्रीनगर-कारगिल-लेह हायवेवरील ज्या भागात येतो, तेथे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते.
- बर्फवृष्टीमुळे हायवेवरील एक भाग कित्येक महिने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत असे.
- पण आता झेड मोऱ्ह बोगदा आणि त्यासह तयार होणाऱ्या आणखी एका बोगद्यामुळे वर्षभर कोणत्याही अडथळ्याविना भारतीय सैन्यासह सामान्य नागरिक प्रवास करू शकतील.
- या प्रकल्पांतर्गत बांधल्या जाणाऱ्या दोन बोगद्यांपैकी पहिला बोगदा गंदरबल जिल्ह्यातील गगनगीर आणि सोनमर्ग दरम्यानचा झेड-मोऱ्ह बोगदा आहे.
- दुसरा बोगदा म्हणजे झोजिला बोगद्याची लांबी 14 किलोमीटर आहे आणि हा मार्ग बालटालहून झोजिला जवळील मिनीमार्ग म्हणजे द्रासपर्यंत असणार आहे.
- झोजिला बोगद्याचे काम वर्ष 2026पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
J&K सोनमर्ग बोगद्याचा शुभारंभ, PM Narendra Modi Live | Nitin Gadkari