PM MOdi Speech : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियन तेल खरेदी केल्याबद्दल 25 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादले आहे. यामुळे भारतीय वस्तूंवर असलेले एकूण शुल्क आता 50 टक्के इतके झाले आहे. या निर्णयानंतर अवघ्या एका दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भारताची ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी 'एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषद'मध्ये बोलताना, शेतकरी आणि मच्छिमारांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही, असे ठणकावून सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "शेतकऱ्यांचे हित हे आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छिमारांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही." या भूमिकेमुळे मला वैयक्तिकरित्या मोठी किंमत चुकवावी लागेल, याची मला जाणीव आहे, पण मी त्यासाठी तयार आहे, असेही त्यांनी सांगितले. "आपल्या देशातील शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालकांच्या हितासाठी संपूर्ण भारत तयार आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी यांचे हे वक्तव्य अमेरिकेने भारतावर शुल्क वाढवल्यानंतर लगेचच आले आहे. यातून भारताने अमेरिकेला एक स्पष्ट संदेश दिला आहे की, भारताचे व्यापार धोरण हे देशाच्या राष्ट्रीय हितांवर, विशेषतः कृषी क्षेत्रावर आधारित असेल.
या वाढलेल्या शुल्कामुळे भारताच्या निर्यात क्षेत्राला मोठा फटका बसणार असल्याचे उद्योग तज्ज्ञांनी म्हटले आहे. विशेषतः वस्त्रोद्योग, चामडे, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटो पार्ट्स यांसारख्या उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या शुल्कामुळे भारतीय वस्तू अमेरिकेच्या बाजारात 50 टक्के अधिक महाग होतील, ज्यामुळे निर्यात सुमारे 40 टक्के ते 50 टक्क्यांनी कमी होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.