आजोबा माजी पंतप्रधान, वडील माजी मुख्यमंत्री आणि स्वत: खासदार म्हणून निवडून आलेल्या प्रज्ज्वल रेवण्णा याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने शुक्रवारी बलात्कार आणि अश्लील व्हिडीओ काढल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्याला काय शिक्षा देण्यात यावी यावर सरकारी वकील आणि रेवण्णाच्या वकिलांमध्ये युक्तिवाद झाला. सरकारी वकिलांनी रेवण्णा हा निर्ढावलेला आरोपी असून त्याने बलात्कारासारखे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय कृत्य वारंवार केल्याचे म्हणत त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. रेवण्णा याला कठोर शिक्षा झाली तर असा गुन्हा करण्यापूर्वी कोणीही दहावेळा विचार करेल आणि समाजात योग्य तो संदेश जाईल असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
( नक्की वाचा: बलात्कार प्रकरणात दोषी ठरला, कोर्टात ढसाढसा रडला )
पीडित महिलेच्या बाजूने युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील बी. एन. जगदीश यांनी सांगितले की, गरीब आणि अशिक्षित असलेली ही महिला घरकाम करून दरमहा 10,000 रुपये कमवते. तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला, तिला ब्लॅकमेल करण्यात आले आणि तिला घर सोडून पळून जाण्यास भाग पाडले. "गुन्हेगार हा प्रभावशाली व्यक्ती असून त्याने तिला सहजपणे लक्ष्य केले. आपला अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर तिने आत्महत्येचा विचारही केला होता," असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
जगदीश यांनी पुढे म्हटले की ,प्रज्ज्वल हा खासदार म्हणून निवडून आला, त्याला कायद्याची पूर्णपणे जाण आहे. मात्र असे असतानाही त्यांनी लैंगिक अत्याचाराचे व्हिडीओ रेकॉर्ड करणे ही त्याची मानसिकता काय आहे हे दर्शवण्यासाठी पुरेसे आहे. प्रज्ज्वल रेवण्णा हा निर्ढावलेला गुन्हेगार असून त्याने असली कृत्ये वारंवार केली आहेत. यातल्या एकहा कृत्याबद्दल त्याला पश्चाताप झालेला नाही हे न्यायालयाने लक्षात घेणे गरजेचे आहे.