प्रियांका गांधी वायनाडची पोटनिवडणूक जिंकल्या आणि प्रियांका गांधींची संसदेत एन्ट्री झाली. पहिल्याच अधिवेशनात प्रियांका गांधींची एन्ट्री झाली ती त्यांच्या हटके बॅगांसह. प्रियांका गांधी यांच्या 'बॅग पॉलिटिक्स'ची हिवाळी अधिवेशनादरम्यान जोरदार चर्चा आहे. प्रियांका गांधी यांची प्रत्येक बॅग म्हणजे त्यांचं पॉलिटिकल स्टेटमेंट असल्याचं म्हटलं जातं. प्रियांका गांधींनी पहिल्या दिवशी पॅलेस्टाईन लिहिलेली तर दुसऱ्या दिवशी बांगलादेशची बॅग संसदेत आणली..
नक्की वाचा - चेक्सची साडी अन् ती पॅलेस्टाईनची बॅग; भाजप नेत्यांकडून प्रियांका गांधी का झाल्या ट्रोल?
प्रियंका गांधींचं बॅग पॉलिटिक्स जोरात सुरू असताना त्यांना आणखी एक बॅग भाजपकडून भेट देण्यात आली आहे. भाजपच्या ओडिशामधल्या भुवनेश्वरच्या खासदार अपराजिता सारंगी यांनी प्रियांका गांधी यांना 1984 लिहिलेली बॅग भेट दिली आहे. या बॅगेवर 1984 असं रक्तरंजित अक्षरांनी दिलेलं आहे. 1984 च्या शीख दंगलींची आठवण करुन देण्यासाठी प्रियांकांना ही बॅग भेट देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रियांका गांधींच्या बॅग्ज आणि त्यामागील राजकारण....
प्रियांका गांधी सोमवारी पॅलेस्टाईनची बॅग घेऊन संसदेत आल्या होत्या. सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध सुरू आहे. पॅलेस्टाईनची बॅग घेऊन प्रियांका गांधींनी पॅलेस्टाईनचं समर्थन केलंय. बॅगेवर पॅलेस्टिनी चिन्हांपैकी एक टरबूजाचं चिन्ह होतं. टरबूजाचं हे चिन्ह पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी जगभरात वापरलं जातं. याआधीही प्रियांका गांधींनी इस्रायल सरकारचा निषेध केला होता. नेतान्याहू यांचं सरकार अन्यायकारी असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. नवी दिल्लीत पॅलेस्टाईन दूतावासातल्या अधिकाऱ्यांनीही प्रियांका यांच्या वायनाडमधल्या विजयाचं अभिनंदन केलं होतं.
प्रियांका गांधींनी पॅलेस्टाईनची बॅग घेतल्यानं भाजपकडून जोरदार टीका...
भाजपनं प्रियांका गांधींवर तुष्टीकरणाचा आरोप केला आहे. काँग्रेस ही नवी मुस्लीम लीग असल्याचा आरोप भाजपा नेते अनिर्बान गांगुली यांनी केला आहे. पंडित नेहरूंपासून ते प्रियंका गांधींपर्यंत काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांची हिंदूविरोधी मानसिकता राहिली आहे, असंही गांगुली यांनी म्हटलंय. आधी असदुद्दीन ओवैसी यांनी ‘जय पॅलेस्टाईन'चा नारा दिला आणि आता प्रियांका गांधींनी पॅलेस्टाईनची बॅग संसदेत आणली, असं भाजपनं म्हटलं आहे.
तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी इस्रायलचं कौतुक करत प्रियांका गांधींवर निशाणा साधला.
नक्की वाचा - हत्येचा प्रयत्न, धमकी आणि...; राहुल गांधींविरोधात FIR दाखल, ती 6 कलमं कोणती?
पॅलेस्टाईनची बॅग आणल्याबद्दल पाकिस्तानात प्रियांका गांधींचं समर्थन केलं जातंय. पाकिस्तानच्या तेहरिक-ए-इन्साफचे नेते फवाद चौधरी यांनी प्रियांका गांधींचं कौतुक केलं आहे. जवाहरलाल नेहरूंसारख्या उत्तुंग स्वातंत्र्यसैनिकाच्या नातवंडाकडून आपण अशीच अपेक्षा करू शकतो. आजपर्यंत कोणत्याही पाकिस्तानी संसद सदस्याने असं धाडस दाखवलं नाही. हे लाजिरवाणं आहे, असं चौधरी यांनी म्हटलं आहे. पॅलेस्टाईनच्या समर्थनाबद्दल टीका होत असतानाच प्रियांका गांधींनी दुसऱ्या दिवशी बांगलादेशातल्या हिंदूंच्या समर्थनार्थ बॅग घेऊन आल्या. बांगलादेश हिंदुओ और ईसाईयों के साथ खडे रहो, असा मजकूर या बॅगेवर लिहिला होता. बांगलादेशातलं शेख हसिना यांचं सरकार उलथवलं गेल्यापासून हिंदूंवरचे हल्ले वाढलेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रियांका गांधींनी ही बॅग आणल्याचं म्हटलं जात आहे. त्याचवेळी संसदेतही प्रियांका गांधी यांनी बांगलादेशात हिंदूंवरच्या अत्याचारांविरोधात आवाज उठवला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रियांका यांच्यावर बॅगांवरुन टीका झाल्यानंतर प्रियांका यांनीही मला हवं तेच घालेन आणि मला हवं तेच वापरेन म्हणत विरोध करणाऱ्यांना ठणकावलंय. एखाद्या घटनेकडे लक्ष वेधण्याची प्रियंका गांधींची ही नवी फॅशन आहे. एक शब्दही न बोलता निषेधाचा हा नवा फॅशन फॉरमॅट आहे. म्हणूनच यापुढेही प्रियांका गांधी काय हटके राजकारण करतात, याकडे लक्ष असेल.